पाकच्या संसदेत मोदी-मोदी घोष झाला नव्हता; खरा VIDEO आला समोर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

पाकिस्तानच्या संसदेमध्ये चक्क मोदी- मोदी आणि आझादीच्या घोषणा ऐकायला मिळाल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. यासोबत पाकिस्तानच्या संसदेतील एक व्हिडिओसुद्धा शेअर केला जात होता. 

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या संसदेमध्ये चक्क मोदी- मोदी आणि आझादीच्या घोषणा ऐकायला मिळाल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. यासोबत पाकिस्तानच्या संसदेतील एक व्हिडिओसुद्धा शेअर केला जात होता. मात्र पाकच्या संसदेत मोदी मोदी अशा घोषणा दिल्या नसल्याचे आता समोर आले आहे. 

पाकच्या संसदेत गुरुवारी खूप गदारोळ झाला. बलुचिस्तानच्या खासदारांनी नारेबाजी केली आणि यावेळी पाकचे परराष्ट्रमंत्री चिडल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, यावेळचा व्हिडिओ व्हायरल करून त्यात मोदी मोदी अशा घोषणा दिल्याचा दावा करण्यात येत होता. 

सोशल मीडियावर इंडिया टीव्हीचा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, पाकच्या संसदेत मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जात आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंड साउंड स्पष्ट ऐकू येत नाही.

पाकच्या संसदेतील हाच व्हिडिओ दुनिया न्यूजच्या युट्यूब चॅनेलवरसुद्धा आहे. या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंड साउंड स्षष्ट ऐकू यतो. यामध्ये जो आवाज मोदी मोदी असल्याचा दावा करण्यात आला तो प्रत्यक्षात वोटिंग वोटिंग असा आहे.

व्हिडिओ सुरू झाल्यानंतर सहा सेकंदांनी वोटिंग वोटिंग असा आवाज येतो. त्यामध्ये संसदेचे सभापती असंही म्हणतात की, वोटिंग आणि सर्व काही होईल. तुम्ही संयम ठेवा. 

हे वाचा - पुलवामा हल्ला इमरान खान यांच्या नेतृत्वातील मोठं यश; संसदेत पाक मंत्र्यानं दिली 'नापाक' इराद्याची कबुली

पुलवामा हल्ल्याबाबत पाकच्या एका मंत्र्याने तो हल्ला आम्हीच केला असं म्हटल्यानं इम्रान खान यांची नाचक्की झाली. दुसरीकडे विरोधी पक्षनेत्याने भारताच्या हवाई दलाचे विंग कंमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबाबतही एक खुलासा केला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते, त्यांना घाम फुटला होता असा दावा पाकिस्तानच्या संसदेत बुधवारी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pak parliament video claim modi modi chants not true