esakal | होय दाऊद इब्राहिम कराचीतच; पाकिस्तानने पहिल्यांदाच दिली कबुली
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan admits dawood ibrahim in karachi bans 88 terrorist organisations

मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम असून, तो गेली कित्येक वर्षे पाकिस्तान कराचीमध्ये लपून बसल्याचं भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगितलं आहे. 

होय दाऊद इब्राहिम कराचीतच; पाकिस्तानने पहिल्यांदाच दिली कबुली

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

इस्लामाबाद  :  दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून पाकिस्तानची (Pakistan) आंतरराष्ट्रीय पातळीवर गोची झाली आहे. त्यामुळेच पाकिस्तानने आज 88 दहशतवादी संघटनांवर बंदी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, त्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचं (dawood ibrahim) नाव आहे. या निमित्ताने पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानात असल्याचं कबुल केलंय. मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम असून, तो गेली कित्येक वर्षे पाकिस्तान कराचीमध्ये (karachi) लपून बसल्याचं भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगितलं आहे. 

काय आहे पार्श्वभूमी?
आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक गैरव्यवहार आणि विशेषतः दहशतवाद्यांना पुरवण्यात येणारा पैसा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स ही (FATF) संस्था काम करते. यासंस्थेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्ताननं शक्कल लढवली असून, 88 दहशतवादी संघटनांवर बंदी जाहीर केली आहे. त्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा मसूद अझहर, 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद या तीन बड्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. FATFने 2018मध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमध्ये केला होता. त्यानंतर 2019पर्यंत पाकिस्तानला सुधारणाकरण्याची संधीही दिली होती. त्यानंतर कोरोनाच्या काळात ही मुदत वाढवण्यात आली होती. प्रत्यक्ष कारवाई सुरू करायला ऑगस्ट 2020 उजाडले आहे. 

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

दाऊदची संपत्ती जप्त होणार?
पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूजने पाकिस्तानच्या निर्णया  संदर्भात सविस्तर वृत्त दिले आहे. त्यानुसार पाकिस्तानातील 88 दहशतवादी संघटना आणि त्यांच्या प्रमुखांवर बंदी घालण्यात आली आहे. यात जमात-उद-दावा, जैश-ए-मोहम्मद, तालीबान, दाएश, हक्कानी समूह, अल-कायदा यासह इतर छोट्या दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. या निर्णयानुसार पाकिस्तानी सरकारच्या या आदेशानुसार या संघटनांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर टाच आणण्यात येणार आहे.