जगासमोर पाकिस्तान पडले तोंडावर

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मागील काही दिवसांमध्ये पाकिस्तानने याच मुद्यावरून अमेरिका आणि चीनशीही संधान साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात इम्रानशाही सपशेल अपयशी ठरली असून, आता याच मुद्यावरून रशियानेही भारताला पाठिंबा दिला आहे.

वॉशिंग्टन : भारताने जम्मू-काश्‍मीरमधील 370 वे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने याच मुद्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर बराच कांगावा करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाकडून देखील पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती राजनैतिक सूत्रांनी दिली आहे.

मागील काही दिवसांमध्ये पाकिस्तानने याच मुद्यावरून अमेरिका आणि चीनशीही संधान साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात इम्रानशाही सपशेल अपयशी ठरली असून, आता याच मुद्यावरून रशियानेही भारताला पाठिंबा दिला आहे. जम्मू आणि काश्‍मीर हा आमचा अंतर्गत विषय असून, पाकिस्तानने यामध्ये लुडबूड करू नये, अशा स्पष्ट शब्दांत भारताने सुनावले असून, पाकने मात्र नेहमीप्रमाणे थयथयाट करीत भारतासोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकी प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी या मुद्यावरून अमेरिकेत जोरदार लॉबिंग करीत असले, तरीसुद्धा व्हॉइट हाऊसने मात्र त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवून असून, आता तालिबाननेही अफगाणिस्तानातील शांती चर्चा काश्‍मीरसोबत जोडू नका, असे म्हटल्याने पाकची गोची झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan is alone on Issue of Article 370 in UN