पाकिस्तानचे शेपूट वाकडेच; लष्कराच्या प्रवक्त्याचे भडकाऊ वक्तव्य

टीम ई-सकाळ
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

काही दिवसांपूर्वी अणू युद्धाची भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तानातील नेते रोज काही ना काही वक्तव्य करून वादाला तोंड फोडत आहेत. आता पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांनी भारताविरोधात वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला. त्यानंतर त्याचे सर्वाधिक पडसाद भारतापेक्षा पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी जागतिक पातळीवर हा मुद्दा उपस्थित  केला. पण, खान तोंडघशी पडले. काही दिवसांपूर्वी अणू युद्धाची भाषा करणाऱ्या इमरान यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तानातील नेते रोज काही ना काही वक्तव्य करून वादाला तोंड फोडत आहेत. आता पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांनी भारताविरोधात वक्तव्य केले आहे.

नेटकरी म्हणतायत, ‘लतादीदी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’

‘म्हणे काश्मिरींना हवी ती मदत करू’
काश्‍मीरसाठी पाकिस्तानचा प्रत्येक सैनिक शेवटची गोळी आणि शेवटच्या श्‍वासापर्यंत लढेल, अशी वल्गना पाकिस्तानच्या सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी केली आहे. काश्‍मिरी जनतेला सर्वतोपरी मदतीस आम्ही तयार आहोत. पण, पाकिस्तान हा जबाबदार देश असल्यामुळे जागतिक शांतता धोक्‍यात येईल, असे कोणते कृत्य करणार नाही, असा दावाही त्यांनी केला. जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम भारताने रद्द केल्यापासून पाकिस्तानी नेते बिथरले आहेत. ते, वारंवार प्रक्षोभक विधाने करीत आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर बोलताना गफूर यांनी काश्‍मीरचे तुणतुणे वाजवलेच. काश्‍मिरातील गेल्या 72 वर्षांतील स्थितीचा पाढा त्यांनी वाचला आणि मग पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. आम्ही कायम काश्‍मिरी जनतेबरोबर असल्याचे सांगत, या मुद्द्यावर पाकिस्तान कोणतीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले. आम्हाला युद्ध नको; पण कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास आम्ही तयार आहोत, असा दावाही त्यांनी केला. 

हर्षवर्धन पाटील यांच्या बचावासाठी सरसावले बाळासाहेब थोरात

इमरान खान नरमले
भारताविरोधात युद्धाची आणि अणू युद्धाची भाषा वापरणाऱ्या इमरान खान यांच्या भाषेत बदल झाला आहे. विरोधी पक्ष आणि देशातील इतर नेत्यांनी इमरान खान यांच्यावर सतत दबाव टाकला जात असल्यामुळे खान यांनी सार्वजनिक सभांमध्ये युद्धाची भाषा वापरायला सुरुवात केली होती. पण, त्यांच्या भाषेत थोडा बदल झाला आहे. युद्धाच्या परिस्थितीत पाकिस्तान पहिल्यांदा अणू शक्तीचा वापर करणार नाही, असे इमरान खान यांनी स्पष्ट केले होते. जगात अणू युद्धात कोणी विजयी झाल्याचा इतिहास नाही. भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे युद्धाचे परिणाम दोन्ही देशांवर होतील. यात पाकिस्तान पहिल्यांदा अण्वस्त्रे वापरणार नाही, असे खान म्हणाले होते. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे त्यांना युद्ध परवडणारे नाही. आर्थिक अडचणीतून देशाला कसे बाहेर काढावे, याचेच मोठे आव्हान सध्या खान यांच्यापुढे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan army spokesperson controversial statement jammu and kashmir article 370