पाकिस्तानचं मिसाईल परिक्षण फेल; यश मिळाल्याचा खोटा दावा

टीम ई सकाळ
Thursday, 21 January 2021

शाहीन 3 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याची घोषणा पाकिस्तानने केली. मात्र आता बलुचिस्तानच्या नेत्यांनी केलेल्या ट्विटमुळे पाकचा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.

कराची - अमेरिकेत जो बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या काही तास आधी पाकिस्तानने बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी घेतली. शाहीन 3 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याची घोषणा पाकिस्तानने केली. मात्र आता बलुचिस्तानच्या नेत्यांनी केलेल्या ट्विटमुळे पाकचा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.

बुधवारी पाकिस्तानच्या लष्कराने सांगितलं की, शाहीन 3 क्षेपणास्त्र हे तांत्रिकदृष्ट्या आणि आधुनिक शस्त्रांच्या तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनीही वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं आहे. दरम्यान, पाकची ही क्षेपणास्त्र चाचणी वादात अडकली आहे. याची चाचणी बलुचिस्तानच्या डेरा गाजी खान इथं घेण्यात आली होती. 

हे वाचा - 'व्हाइट हाऊस' सोडताना मेलानिया ट्रम्प यांची छबी डागाळली; चहूबाजूंनी होतेय टीका

बलुचिस्तान रिपल्बिकन पार्टीने म्हटलं की, शाहीन 3 प्रक्षेपणानंतर बुग्तीमधील भागात कोसळले. या चाचणीवेळी काही लोक जखमी झाले आहे. बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टीचे प्रवक्ते शेर मोहम्मद बुग्ती यांनी म्हटलं की, पाकिस्तानच्या लष्कराने बलुचिस्तानला प्रयोगशाळा बनवलं आहे. लष्कराने शाहीन 3 ची चाचणी गाजी खान या भागात घेतली. त्यानंतर मिसाइल बुग्ती भागात येऊन कोसळलं. या भागामध्ये लोकांची वस्ती असून काही घरांचं नुकसान झालं असल्याची माहितीही देण्यात आली. यामध्ये काही लोक जखमी झाल्याचे बलुचिस्तान रिपब्लिकनने म्हटलं आहे.

बुग्ती यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये #MissileAttackInDeraBugti टॅग वापरून म्हटलं की, बलुचिस्तान आमची मातृभूमी असून ती प्रयोगशाळा नाही. आम्ही सर्व पीडित देशांना आवाहन करतो की त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या या मिसाइल चाचणीविरोधात आवाज उठवावा. 

हे वाचा - छप्पर फाड के! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मिळतो एवढा पगार; तरीही काहींनी नाकारलं वेतन

बलुचिस्तानमधील एका मानवाधिकार कार्यकर्त्याने ट्विटरवर म्हटलं की, पाकिस्तान नेहमीच बलुचिस्तानमध्ये त्यांच्या धोकादायक अशा शस्त्रांची चाचणी घेतं. आज त्यांनी शाहीन 3 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आणि ते क्षेपणास्त्र बुग्तीमध्ये कोसळलं. यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. 

पाकिस्तानने म्हटलं की, शाहीन 3 ची टार्गेट क्षमता 2750 किलोमीटर इतकी आहे. या चाचणीवेळी स्ट्रॅटेजिक प्लॅन्स डिव्हिजन आणि टॉप कमांडर उपस्थित होते. पाकिस्तानने या चाचणीबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. स्वसंरक्षणाच्या नितीनुसार ही चाचणी करण्यात आल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan claim sucessfully launch shaheen 3 missile but baloch leader tweet reveal