पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारताच्या तीन 'हेरां'ना अटक!

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

गेल्या दोन वर्षांत खलील 15 वेळा प्रत्यक्ष ताबारेषा पार करून भारतात गेला होता, अशी कबुली दिल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. तसेच, रशीद आणि इम्तियाझ हे दोघेही सहा वेळा भारतात गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

इस्लामाबाद: भारतीय गुप्तचर यंत्रणेचे हेर असल्याचा आरोप ठेवत नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने निर्माण झालेला तणाव कायम असतानाच 'पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये 'रॉ'च्या तीन हेरांना अटक केली' असा दावा पाकिस्तानने केला आहे. 'डॉन' या पाकिस्तानमधील वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली आहे. 

या तिघांवर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्‍मीरमधील पोलिस ठाण्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या पोलिसांनी या तिघांना माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर हजर केले. अर्थात, त्यांचे चेहरे झाकलेले होते. महंमद खलील, इम्तियाझ आणि रशीद अशी त्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले. हे तिघेही पाकव्याप्त काश्‍मीरमधील अब्बासपूरचे रहिवासी आहेत. 

पाकिस्तानच्या पोलिस दलाने केलेल्या दाव्यानुसार, महंमद खलील 2014 च्या नोव्हेंबरमध्ये काश्‍मीरमधील बंडी चेचियन गावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला असताना तेथे 'रॉ'च्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये परतल्यानंतर खलीलने इम्तियाझ आणि रशीद यांना 'रॉ'साठी काम करण्यास फितविले. गेल्या दोन वर्षांत खलील 15 वेळा प्रत्यक्ष ताबारेषा पार करून भारतात गेला होता, अशी कबुली दिल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. तसेच, रशीद आणि इम्तियाझ हे दोघेही सहा वेळा भारतात गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

खलीलकडे भारतीय अधिकाऱ्यांनी दोन मोबाईल फोन दिले होते आणि या फोनमधून तो पाकव्याप्त काश्‍मीरमधील पूल, मशिदी आणि संरक्षण दलांच्या तळाची छायाचित्रे काढत होता, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या दाव्यानुसार, पाकव्याप्त काश्‍मीरमधील संरक्षण दलांच्या कोणत्याही तळावर स्फोट घडवून आणण्याचे काम 'रॉ'ने खलीलवर सोपविले होते. यासाठी 'रॉ'ने खलीलला पाच लाख, तर इम्तियाझ आणि रशीदला अनुक्रमे दीड लाख आणि 50 हजार रुपये देण्याचे कबुल केले होते. गेल्या वर्षी 27 सप्टेंबर रोजी अब्बासपूरमधील पोलिस ठाण्याच्या इमारतीत या तिघांनी स्फोट घडवून आणला, असा आरोपही पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना '26 सप्टेंबर रोजी हे तिघे बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरत होते' असे काही साक्षीदारांनी सांगितल्यामुळे त्यांना अटक केली, असे पोलिस म्हणाले.

Web Title: Pakistan claims to have arrested three RAW agents in PoK