
पाकिस्तानच्या न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
इस्लामबाद : पाकिस्तानच्या न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये पोसल्या जाणाऱ्या दहशतावाद्यांविरोधात कारवाई करण्याचा दबाव आंतरराष्ट्रीय पातळीवरुन सातत्याने असतो. यामुळेच पाकिस्तानी दहशतवाद विरोधी न्यायालयाने टेरर फायनान्सिंगच्या प्रकरणात या जागतिक दहशतवाद्यावर 200,000 पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दहशतवादी संघटनांना पैसे पुरवण्याच्या चार वेगवेगळ्या प्रकरणात हाफिज सईदला याआधीच 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
हाफिज सईदला आता दहशतवादास आर्थिक रसद पुरवण्याच्या पाच प्रकरणात लाहोरच्या लखपत तुरुंगात एकूण 36 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. पाचही प्रकरणांची शिक्षा एकत्रच भोगावी लागेल. आता 70 वर्षांच्या हाफिज सईदला उरलेलं आयुष्य तुरुंगातच काढावं लागेल असं म्हटलं जात आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने जमात-उ-दावाच्या विरोधात 41 केसेस दाखल केल्या आहेत. यातील 25 प्रकरणांचा आतापर्यंत निकाल आला आहे.
हेही वाचा - भारतात शेतकरी आंदोलन; अमेरिकेच्या खासदारांनी परराष्ट्रमंत्र्यांना पत्रातून व्यक्त केली चिंता
हाफिजच्या विरोधात पाकची कारवाई कशासाठी?
पाकिस्तानला फेब्रुवारीत होणाऱ्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (FATF) बैठकीत ग्रे लिस्टमधून बाहेर यायचं आहे. म्हणूनच पाकिस्तान हा दिखावूपणा करत आहे की त्यांनी दहशतवादाविरोधात पाऊल उचललं आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या FATF च्या बैठकीत देखील पाकिस्तानवर दहशतवादाविरोधात काम न केल्यामुळे ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यावर सहमती झाली होती. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, कोर्टाच्या या शिक्षेचा सईदवर काहीही फरक पडणार नाहीये. त्याला लवकरच नजरकैदेत ठेवण्यात येईल तसेच त्याला त्याची संपत्तीही परत करण्यात येईल.