हाफिज सईदला 11 वर्षांचा तुरुंगवास

पीटीआय
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

दहशतवादविरोधी न्यायालयाने ११ डिसेंबर रोजी दहशतवाद्यांना अर्थपुरवठाप्रकरणी सईद आणि त्याच्या साथीदाराला दोषी ठरविले होते.

लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईदला दहशतवादी संघटनेला अर्थपुरवठा केल्याप्रकरणी 11 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आज पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने सुनावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हाफिज सईद सध्या लाहोरच्या अतिकडक सुरक्षा व्यवस्थेतील कोट लखपत तुरुंगात आहे. त्याला गेल्यावर्षी १७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. दहशतवादी संघटनांना पैसा पुरविल्याप्रकरणी हाफिज सईदवर लाहोर आणि गुजरानवाला येथे गुन्हे दाखल असून, या प्रकरणात सईदला शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी साडेपाच वर्षे असे एकूण अकरा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय प्रत्येक प्रकरणात पंधरा हजार रुपयाचा दंडही ठोठावला आहे.

5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती

दहशतवादविरोधी न्यायालयाने ११ डिसेंबर रोजी दहशतवाद्यांना अर्थपुरवठाप्रकरणी सईद आणि त्याच्या साथीदाराला दोषी ठरविले होते. गेल्या शनिवारी न्यायाधीश अर्शद हुसेन भुट्टा यांनी सईदविरुद्धचा निकाल ११ फेब्रुवारीपर्यंत स्थगित केला होता. 

अमेरिकेने दहशतवादी सईदवर दहा लाख अमेरिकी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. हाफिज सईदची जमात उद दवा ही दहशतवादी संघटना लष्करे तय्यबासाठी पैशाची सोय करते. त्यामुळे ही संघटना पाकिस्तानची एफटीएफ आणि अमेरिकेच्या रडारवर होती. लष्करे तय्यबाने २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला केला आणि त्यात १६६ जण ठार झाले होते. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानला हाफिजविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

दहशतवाद नियंत्रण खात्याकडून (सीटीडी) हाफिज सईद आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध २३ गुन्हे दाखल केले आहेत. पंजाब प्रांतातील विविध शहरांत दहशतवादी संघटनेला पैसे दिल्याचा हाफिजवर ठपका आहे. यात लाहोर, गुजरानवाला, मुलतान येथील समावेश आहे. अल अनफाल ट्रस्ट, दवातुल इर्शाद ट्रस्ट, मुआज बिन जबाल ट्रस्ट आदींच्या नावाने फंड गोळा केला जात असे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Court Sentences Terrorist Hafiz Saeed To 11 Years In Jail In Terror Financing Cases