पाकचे परराष्ट्रमंत्रीही अपात्र ; उच्च न्यायालयाचा निर्णय

पीटीआय
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

"पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ'चे नेते उस्मान दर यांनी असीफ यांना अपात्र ठरविण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत असीफ यांनी दर यांचा पराभव केला होता. दरम्यान, या आदेशाची प्रत निवडणूक आयोग तसेच, संसदेला पाठिवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

इस्लामाबाद : निवडणुकीदरम्यान "यूएई'चे वर्क परमिट असल्याची बाब लपविल्याप्रकरणी आज इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असीफ यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरविले. या निर्णयामुळे यापूर्वी पंतप्रधान म्हणून अपात्र ठरविलेल्या नवाज शरीफ यांच्या पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. 

याप्रकरणी आज तीनसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने असीफ हे अप्रामाणिक असल्याचे स्पष्ट करत त्यांना अनुच्छेद 62-(1)(फ) नुसार, अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला. यामुळे आता असीफ यांना तहहयात कोणत्याही सार्वजनिक तसेच, पक्षाच्या पदावर काम करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

"पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ'चे नेते उस्मान दर यांनी असीफ यांना अपात्र ठरविण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत असीफ यांनी दर यांचा पराभव केला होता. दरम्यान, या आदेशाची प्रत निवडणूक आयोग तसेच, संसदेला पाठिवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार 

या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती ख्वाजा असीफ यांनी दिली. दरम्यान, असीफ हे कंपनीत सल्लागार म्हणून कार्यरत होते. ते पूर्णवेळ कर्मचारी नसून, त्यांना कामाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे बंधनही नव्हते, अशा आशयाचे कंपनीचे पत्र असीफ यांनी न्यायालयात सादर केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Foreign Minister Khwaja Disqualified Decision of High Court