अरारारारा... पाकवर सर्वांत मोठे पार्क गहाण ठेवायची आली वेळ; जिन्नांची ओळख विकून लोन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

पाकिस्तानवर आपल्याच देशातील अनेक गोष्टी विकायची आणि गहाणवट ठेवायची वेळ आलीय.

इस्लामाबाद : पाकिस्तान जगातील अनेक देशांकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय. आणि आता पाकिस्तानवर आपल्याच देशातील अनेक गोष्टी विकायची आणि गहाणवट ठेवायची वेळ आलीय. इम्रान खान सरकार आता राजधानी इस्लामाबादमधील सर्वात मोठ्या पार्कला गहाण ठेवणार आहे. खान सरकारला आशा आहे की, या पार्कला गहाण ठेवून त्यांना 500 अब्ज डॉलरचे कर्ज प्राप्त होईल. हे पार्क इस्लामाबादमधील एफ-9 सेक्टरमध्ये आहे. या पार्कला गहाण ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा येत्या मंगळवारी होणाऱ्या इम्रान खान सरकारच्या कॅबिनेट बैठकीत होणार असल्याची माहिती आहे. 

सर्वांत मोठे पार्क गहाण
पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणींमुळे सरकारने बाँड जाहीर करण्याच्या माध्यमातून 500 अब्ज रुपयांचे कर्ज प्राप्त करण्यासाठी राजधानीतील एफ-9 पार्कला गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी विकास प्राधिकरणाने यासंबंधीचे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. याआधी सुद्धा पाकिस्तानने आपल्या अनेक संस्था, इमारती आणि रस्ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाँड्सच्या माध्यमातून कर्ज प्राप्त करण्यासाठी तारण ठेवलं आहे. 

हेही वाचा - Breaking- भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 20 सैनिक जखमी झाल्याची शक्यता

जिन्नांच्या बहिणीच्या नावे आहे पार्क
F-9 पार्कला फातिमा जिन्ना पार्क म्हणून देखील ओळखलं जातं. हे पार्क 759 एकर जमिनीवर पसरलेले आहे. हे एक सार्वजनिक मनोरंजन पार्क आहे. हे पार्क पाकिस्तानातील सर्वांत मोठ्या बहरलेल्या  पार्कमधील एक पार्क आहे. या पार्कचं नाव मदार-ए-मिलत फातिमा जिन्नाच्या नावावरुन ठेवलं गेलं आहे, ज्या पाकिस्तानच्या संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांची बहिण आहेत. आर्थिक दुर्भिक्ष्यात अडकलेल्या पाकिस्तानला संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाकिस्तान सातत्याने वेगवेगळ्या देशांकडून कर्ज घेत आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आणि नाजूक झाली आहे. कोरोना व्हायरसने तर पाकिस्तानचे कंबरडे आणखीनच मोडले आहे. 

अनेक देशांकडून झालाय कर्जबाजारी
याआधी पाकिस्तानने सौदी अरबकडून देखील कर्ज घेतलं होतं. मात्र पाकिस्तानच्या एका हरकतीमुळे त्यांनी आपले कर्जाचे पैसे परत मागवून  घेतले. यानंतर पाकिस्तानने आपला दोस्त चीनकडून उसने पैसे मागून सौदीचे कर्ज भागवले. आता चीनदेखील पाकिस्तानला कर्ज देण्यापासून हात आखडते घेऊ लागला आहे. त्यामुळे पाकची अवस्था आणखी वाईट होतान दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan imran khan government biggest park loan of rs 500 billion