पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

शाहबाझ कलंदर दर्ग्यात घडविण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पंजाब प्रांतासहच देशाच्या अन्य भागांतही दहशतवाद्यांविरोधात तीव्र मोहिम उघडण्यात आली आहे. या आठवड्याभराच्या काळात पाकिस्तानमध्ये सुमारे 100 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - "लष्कर-इ-इस्लाम' आणि "दाएश' (इस्लामिक स्टेट) या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांच्या खैबर एजन्सीमधील तळांवर पाकिस्तानी सैन्याने हल्ले चढविल्याचे वृत्त येथील "जिओ टीव्ही'ने दिले आहे. या मोहिमेत दहशतवाद्यांचे तीन तळ उध्वस्त करण्यात आले; तर पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतामधील लाल शाहबाझ कलंदर या सुफी संताच्या दर्ग्यात गेल्या आठवड्यात घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. गेल्या गुरुवारी घडविण्यात आलेल्या या हल्ल्यात 88 नागरिक मृत्युमुखी पडले होते.

पाकिस्तानी सैन्याने प्रसिद्ध केलेल्या औपचारिक निवेदनामध्ये पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तान देशास लागून असलेल्या खैबर एजन्सीमधील राजगल येथे केलेल्या हल्ल्यात "अनेक' दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले आहे. शाहबाझ कलंदर दर्ग्यात घडविण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पंजाब प्रांतासहच देशाच्या अन्य भागांतही दहशतवाद्यांविरोधात तीव्र मोहिम उघडण्यात आली आहे. या आठवड्याभराच्या काळात पाकिस्तानमध्ये सुमारे 100 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दहशतवादी "असतील तेथे' त्यांना लक्ष्य करण्याचे स्पष्ट निर्देश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काल (मंगळवार) येथील सैन्यदलास दिल्याचे वृत्त पाकिस्तानमधील प्रभावशाली वृत्तपत्र असलेल्या डॉनने दिले होते. हे दहशतवादी अफगाणिस्तानमधील भूमीच्या आश्रयाने पाकमध्ये हल्ला घडवित असल्याची येथील नेतृत्वाची धारणा आहे. या पार्श्‍वभूमीवर खैबर एजन्सीमध्ये करण्यात आलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: Pakistan kills 'many' terrorists in Khyber Agency