पन्नाशीतल्या खासदारानं केलं १४ वर्षाच्या मुलीसोबत लग्न; पोलिसांकडून चौकशी सुरू

वृत्तसंस्था
Tuesday, 23 February 2021

सदर मुलगी ही जुगूर येथील गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थीनी असून तिची २८ ऑक्टोबर २००६ अशी जन्मतारीख शाळेत नोंदविली गेली आहे. 

चित्राल : पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Balochistan) प्रांतातील एका खासदाराने १४ वर्षाच्या मुलीसोबत लग्न केल्याने खळबळ उडाली आहे. मौलाना सलाहुद्दीन आयुबी असं या नेत्याचं नाव आहे. तो जमीअत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय-एफ) चा नेता असून नॅशनल असेंब्लीचाही सदस्य आहे. 

चित्राल (Chitral, Pakistan) मधील महिला कल्याणासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने तक्रार केल्यानंतर पाकिस्तानमधील पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे. अल्पवयीन मुलीपेक्षा चार पट वयाने मोठा असलेल्या या खासदाराच्या लग्नाची बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती आणि त्याचा अनेकांनी निषेधही व्यक्त केला होता. 

अमेरिकेच्या दूतावासावर डागले 3 रॉकेट; एका आठवड्यात तिसरा हल्ला​

सदर मुलगी ही जुगूर येथील गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थीनी असून तिची २८ ऑक्टोबर २००६ अशी जन्मतारीख शाळेत नोंदविली गेली आहे, अशी माहिती चित्राल पोलिस स्टेशनमधील इन्स्पेक्टर सज्जाद अहमद यांनी दिली आहे. त्यामुळे तिचे लग्नाचे वय झाले नसूनही खासदाराने तिच्याशी लग्न केल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. 

दरम्यान, मौलाना सलाहुद्दीन आयुबी हा एनए-२६ किल्ला अब्दुल्ला या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेला होता. काही दिवसांपूर्वी स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या घरी चौकशी केली, तेव्हा तिच्या वडिलांनी मुलीचे लग्न नाकारले होते. तसेच याबाबतचे प्रतिज्ञापत्रही दिले होते, अशी माहितीही अहमद यांनी दिली आहे. 

भारताचा उदारपणा; इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्र वापराला परवानगी​

पाक कायद्यानुसार, अल्पवयीन मुलीशी लग्न केल्यास किंवा पालकांनी स्वेच्छेने लावून दिले असल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पाक ऑब्जर्व्हरच्या निरीक्षणानुसार, सदर मुलीसोबत निकाह झाला असून अद्याप विवाह सोहळा झालेला नाही. तसेच कायद्यानुसार पाकिस्तानमध्ये १६ वर्षांखालील मुलींच्या लग्नास परवानगीदेखील नाही. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan MP Who is in His Late Fifties Marries 14 Year Old Baloch Girl