पाकच्या उलट्या बोंबा अन्‌ अमेरिकेची चिंता

पाकच्या उलट्या बोंबा अन्‌ अमेरिकेची चिंता

हाफीज सईदच्या सुटकेने आंतरराष्ट्रीय समुदायही चिंतित

इस्लामाबाद : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि "जमात- उद- दावा' या संघटनेचा म्होरक्‍या हाफीज सईद याच्या सुटकेचे पाकिस्तानने निर्लज्जपणे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने दहशतवाद्यांबाबत घालून दिलेल्या निर्बंधांच्या अन्वयेच हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करताना पाकने ही सर्व प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच झाल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायानेही सईदच्या सुटकेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर हाफीज सईदने आज त्याची पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

"लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेचा संस्थापक असणाऱ्या सईदला पकडण्यासाठी अमेरिकेने काही दिवसांपूर्वी 1 कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाप्रमाणेच अमेरिकेनेही सईदला दहशतवादी घोषित केले आहे. सईदच्या सुटकेवर परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली असून, दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याबाबत पाकिस्तान सरकार गंभीर नसल्याचे भारताने म्हटले होते. यावर भाष्य करताना पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते महंमद फैजल म्हणाले, की संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांचे (1267) पालन करण्यास आमचे सरकार कटिबद्ध असून सरकारने या दिशेने बरीच पावलेही उचलली आहेत.

हाफीजला शिक्षा व्हावी : अमेरिका
हाफीज सईदच्या सुटकेबाबत अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकी सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे, की ""लष्करै तैयबाने विविध ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये शेकडो निरपराध लोक मारले गेले असून, यामध्ये अमेरिकी नागरिकांचाही समावेश आहे. पाकिस्तान सरकारने हाफीजच्या मुसक्‍या आवळून गुन्ह्यांनुसार त्याला शिक्षा करणे गरजेचे होते.''

हाफीज सईदचे हात रक्ताने माखलेले असून पाकिस्तानच्या मुख्य राजकीय प्रवाहामध्ये त्याला कट्टरतावाद आणायचा आहे. विविध दहशतवादी संघटनांना हल्ल्यांसाठी त्यानेच मदत केली होती.
- मॉरेल, माजी उपसंचालक, "सीआयए'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com