Coronavirus : कोरोनामुळं जगभरात लॉकडाऊन, पण पाकिस्तानात का नाही?

Pak-Citizens
Pak-Citizens

इस्लामाबाद : देशात कोरोनाची संख्या वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी पूर्ण देश लॉकडाऊनची घोषणा केली. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनाला रोखण्याचा सध्याचा सर्वोत्तम पर्याय असल्याने जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, पारंपरिक शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानने लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. 

आधीच कर्जाच्या खाईत गटांगळ्या खात असलेल्या पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे असतानाही पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाला रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. देशातील प्रमुख उद्योगपती लॉकडाऊनला विरोध करत आहेत. आणि त्यांचा दबाव वाढत असल्याने खान यांनी लॉकडाऊनला स्थगिती दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. 

डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पाकमधील बड्या उद्योगपतींनी स्वत:च्या फायद्यासाठी इम्रान खान सरकारला लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेऊ नये, असा सल्ला दिला होता. जर सरकारने लॉकडाऊन लागू केले, तर खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागण्याची भीती या उद्योगपतींना होती. याच उद्योगपतींच्या फायद्यासाठी इम्रान खान सरकार पाक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. 

दिवसेंदिवस अडचणींमध्ये भर पडत चालली असल्याने इम्रान खान सरकारने आपल्या निर्णयावर यू-टर्न घ्यावा. पाकमधील गरीबांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागणार आहे. कोरोनाचा मुकाबला करत असलेल्या काही प्रांतीय सरकारांची मदत करण्याची तयारी इम्रान खान सरकारने दाखवली आहे, असेही डॉनने म्हटले आहे. 

पाकमध्ये आढळले १०९८ कोरोनाग्रस्त

दरम्यान, कोरोना व्हायरसने पाकिस्तानमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत १०९८ पाक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पाकमधील सिंध प्रांतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. सिंधमध्ये ४१३, पंजाबमध्ये ३२३ तर बलुचिस्तानमध्ये १३१ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. बिघडत चाललेल्या परिस्थितीला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात सैन्याची रवानगी करण्यात आली आहे. 

पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक असलेल्या डॉ. जफर मिर्झा यांनी सांगितले की, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामध्ये २१ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यानंतर इम्रान खान सरकारने देशात सैन्य धाडले आहे. स्वत: पंतप्रधान खान आयसोलेशन सेंटरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 

यासाठी पाकिस्तानने चीनपुढे मदतीसाठी हात पसरले आहेत. सीमाबंदी हटवून अत्यावश्यक सेवा पुरविण्याची विनंती पाकने चीन सरकारकडे केली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com