चीनच्या जीवावर पाकिस्तानचे लसीकरण; पुढील आठवड्यात सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

भारतात देखील गेल्या 16 जानेवारी रोजी लसीकरणास सुरवात करण्यात आली आहे.

इस्लामाबाद : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अजूनही कोरोनाचं संकट संपुष्टात आलं नाहीये. जगभरात विविध देशात लसीकरणास सुरवात झाली आहे. भारतात देखील गेल्या 16 जानेवारी रोजी लसीकरणास सुरवात करण्यात आली आहे. भारताने दोन लसींना मान्यता दिली असून दोन्ही लसींची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे. भारत स्वत:ची गरज भागवून इतर गरीब देशांना मदत करणार आहे. तर दुसरीकडे पुढील महिन्यापासून देशात कोरोनाच्या लसीकरणास सुरवात होणार असल्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. सुरवातीच्या टप्प्यात प्राधान्याने पाकिस्तानातील फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली जाणार आहे. 

हेही वाचा - इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणारी करतेय मनरेगामध्ये रोजंदारी; फी भरता न आल्याने शिक्षण अर्धवट
लसीरकरण मोहिमेची तयारी सध्या सुरु आहे. या लसीकरण मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या आसाद उमर यांनी याबाबत बोलताना यांनी सांगितलं की, अल्लाहच्या इच्छेने पुढील महिन्यात देशात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.  पाकिस्तान सरकारने देशवासीयांना मोफत लस देण्याचं आश्वासन दिलं आहे. सुरवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच वय वर्षे 65 वरील लोकांना लस दिली जाणार आहे. 

पाकिस्तानने आतापर्यंत तीन लसींच्या आपत्कालीन वापराला देशात मंजूरी दिली आहे. यामध्ये ऑक्सफर्डची कोविशील्ड लस, चीनची सिनोफार्म लस आणि रशियाची स्फुटनिक-व्ही या लसी आहेत. चीनने जानेवारी अखेरपर्यंत पाकिस्तानला आपल्या सिनोफार्म लसीचे 500,000 खुराक दान करण्याचे घोषित केले होते. पाकिस्तानने या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आपल्या देशात करायला परवानगी दिली होती. झालेल्या करारानुसार, चीन पाकिस्तानला ही लस पुरवणार आहे. 

पाकिस्तानात आतापर्यंत 539,387 कोरोनाचे रुग्णा सापडले आहेत. तर आतापर्यंत 11,514 लोकांचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांपैकी 494,578 रुग्ण बरे झाले आहेत. पाकिस्तानात आज 28 जानेवारी रोजी 1,910 नवे रुग्ण सापडले आहेत तर 64 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan to start covid 19 vaccination next week