पाकला शस्त्रे पुरविणार नाही; रशियाने भारताची विनंती केली मान्य

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 September 2020

संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी आज रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोइगू यांच्याबरोबर चर्चा केली.

मॉस्को- पाकिस्तानला शस्त्रे न विकण्याचे धोरण कायम राखण्याची भारताची विनंती रशियाने मान्य केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी आज रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोइगू यांच्याबरोबर चर्चा केली.

पाकिस्तानला शस्त्रे न विकण्याचे रशियाचे धोरण आहे. हे धोरण भविष्यातही कायम ठेवावे, अशी विनंती संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी रशियाला आज केली. ही विनंती रशियाने तातडीने मान्य केली. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत राजनाथसिंह आणि शोइगू यांनी अनेक द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. राजनाथ यांच्याबरोबर रशिया दौऱ्यावर आलेले संरक्षण सचिव डॉ. अजयकुमार यांनीही रशियाच्या लष्करी तंत्रज्ञान सहकार्य सेवेचे संचालक दीमित्री शुगाएव यांच्याबरोबर चर्चा केली. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही भारत-रशिया यंग स्कॉलर परिषदेत भाषण केले. भारत आणि रशियामधील मैत्री ही विश्‍वास, आदर आणि समान ध्येय यांच्यावर आधारित असल्याचे मुरलीधरन यावेळी म्हणाले.

पाकिस्तानला मोठा झटका; चीन अध्यक्षांचा पाक दौरा रद्द

तीन गटांची संयुक्त परिषद

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज मॉस्को येथे स्वतंत्र राष्ट्रकुल देश (सीआयएस), शांघाय सहकार्य परिषद (एससीओ) आणि सामुदायिक सुरक्षा करार संघटना (सीएसटीओ) या तीन गटांतील देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या संयुक्त परिषदेला हजेरी लावली. या परिषदेत विविध समान मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan will not supply weapons India request from Russia accepted