पाकिस्तानी मुलगी म्हणते, मोदीजी जिंकलात, आता शांततेचे बघा

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

आपण बंदुकीच्या गोळ्या न विकत घेता, पुस्तके विकत घेतली पाहिजेत. तसेच बंदुका न खरेदी करता, गरिबांसाठी औषधे खरेदी केली पाहिजेत.

इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळविला. आता तुम्ही भारत आणि पाकिस्तानमधील अधिकाधिक नागरिकांची हृदये जिंकण्याचा प्रयत्न करा आणि भारत व पाकमध्ये शांतता राखा, अशी भाबडी इच्छा पाकिस्तानीमधील 11 वर्षांच्या मुलीने मोदींना पत्र लिहून व्यक्त केली आहे.

पाकिस्तानमधील दुनिया न्यूज या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अकिदत नावेद या अकरा वर्षीय मुलीने मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने लिहिले आहे, की भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर या प्रक्रियेला सुरवात केली पाहिजे. नागरिकांची हृदय जिंकणे हे खूप मोठे काम असल्याचे माझ्या वडीलांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक जिंकून तुम्ही नागरिकांची हृदये जिंकली आहेत. आता भारत आणि पाकिस्तानमधील आणखी नागरिकांची हृदये जिंका. यामुळे शांतता, चांगले संबंध निर्माण होतील. आपण बंदुकीच्या गोळ्या न विकत घेता, पुस्तके विकत घेतली पाहिजेत. तसेच बंदुका न खरेदी करता, गरिबांसाठी औषधे खरेदी केली पाहिजेत.

अकिदतने दोन पानी पत्र लिहिले असून, या पत्रात तिने मोदींना विजयाबद्दल शुभेच्छाही दिल्या आहेत. उत्तर प्रदेशात भाजपने 300 हून अधिक जागा जिंकत मोठा विजय मिळविला होता. 

Web Title: Pakistani girl writes to PM Modi, congratulates him for UP victory & calls for turning focus on 'peace'