पाकमधील लग्नात महिलेने नवऱ्याला दिली AK-47; IPS म्हणाले, शेजाऱ्यांच्या या मानसिकतेमुळे...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

हा व्हिडीओ आयपीएस ऑफिसर अरुण बोथरा यांनी शेअर केला आहे तसेच त्यासोबत आपलं मतही मांडलं आहे. 

इस्लामाबाद : सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. लग्नामध्ये नवरदेवाला भेट म्हणून अनेकदा महागड्या वस्तू दिल्या जातात. मात्र, या लग्नात एका महिलेने नवरदेवाला अशी भेटवस्तू दिलीय जी पाहून सगळे नेटकरी चक्रावून गेले आहेत. पाकिस्तानमध्ये एका लग्नादरम्यान एका महिलेने नवरदेवाला एके-47 रायफल भेट दिली आहे. हा व्हिडीओ आयपीएस ऑफिसर अरुण बोथरा यांनी शेअर केला आहे तसेच त्यासोबत आपलं मतही मांडलं आहे. 

हेही वाचा - जर्मनीला हवी स्की रिसॉर्टवर बंदी - अँजेला मर्केल

या व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येतंय की, नवरदेव स्टेजवर नवरीसोबत बसला आहे. तेंव्हा एक महिला येते आणि ती नवरदेवाला शुभेच्छा देऊन त्या नवरदेवाला हातात ही बंदूक देते. नवरदेवदेखील हातात बंदूक घेऊन पोज देतो. नवरीही नवरदेवाच्या हातात बंदूक पाहून हसताना दिसतेय. अरुण बोथरा यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय की, भेटवस्तू आणि आनंद... आपल्या शेजारची मानसिकता... ज्यामुळे आपल्या चहुबाजूला रक्त सांडलं आहे.

या व्हिडीओला आयपीएस बोथरा यांनी 26 नोव्हेंबर रोजी शेअर केलं होतं. या व्हिडीओला आतापर्यंत 33 हजारहून अधिक व्ह्यूज झाले आहेत. सोबतच जवळपास 2 हजार लाईक्स आणि 180 हून अधिक रि-ट्विट्स झाले आहेत. खरंतर लग्नांमध्ये असॉल्ट रायफल भेट म्हणून देणे अमान्य आहे. पण पाकिस्तान तसेच भारतात देखील लग्नांमध्ये वा इतर समारंभांमध्ये बंदूकीने हवेत फैरी झाडल्या जातात. यामध्ये बरेचदा अनावधानाने कुणीतरी जखमी अथवा मृत होण्याचीही शक्यता असते. 

हेही वाचा - कोरोना काळातही US मधील श्रीमंतांच्या संपत्तीत  7,44,20,48,88,00,000 रुपयांची वाढ

मागच्या वर्षी जानेवारीमध्ये सौदी अरबचे राजकुमार फहद बिन सुल्तान बिन अब्दुल अजीन यांनी पाकिस्तानी प्रधानमंत्री इमरान खान यांना गोल्ड प्लेटेड कलाश्निकोव रायफल आणि गोळ्या भेट दिल्या होत्या. मात्र ही गोल्ड प्लेटेड रायफल चालू होती की फक्त शोभेसाठी होती हे नव्हतं कळलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani wedding gift man gets ak 47 rifle from woman ips officer shares viral video