'अल कायदा'च्या म्होरक्‍याला 'आयएसआय'चे संरक्षण

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

सूत्रांच्या माहितीनुसार, लादेनचा 26 वर्षीय मुलगा हम्झा यालाही 'आयएसआय'ने संरक्षण दिले आहे आणि आता 'अल कायदा'मध्ये त्याचे स्थान हळूहळू भक्कम होत चालले आहे. 

इस्लामाबाद : 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या अयमान अल जवाहिरी याला पाकिस्तानच्या 'आयएसआय'ने संरक्षण दिले आहे, असा दावा 'न्यूजवीक'ने केला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर त्याच्यावर ड्रोनमधून हल्ला झाला होता. पण यातून तो थोडक्‍यात बचावला होता. 

अमेरिकी फौजांनी 2001 मध्ये अफगाणिस्तानमधील 'अल कायदा'चे तळ उध्वस्त केले. तेव्हापासून जवाहिरीला 'आयएसआय'ने संरक्षण दिले आहे. यासंदर्भात 'न्यूजवीक'ने काही अधिकाऱ्यांची वक्तव्येही प्रसिद्ध केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जवाहिरी कराचीमध्ये असण्याची दाट शक्‍यता आहे. ओसामा बिन लादेनला अमेरिकेने 2011 मध्ये पाकिस्तानमधीलच अबोटाबादमध्ये घुसून ठार केले होते. त्यावेळी जप्त केलेल्या काही कागदपत्रांवरूनही जवाहिरीच्या ठावठिकाण्याविषयी अंदाज व्यक्त केला जात आहे. 

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बराक ओबामा यांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर ड्रोनद्वारे हल्ले करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यातून तो बचावला होता. पण त्या हल्ल्यात जवाहिरीचे पाच सुरक्षा रक्षक ठार झाले होते. अमेरिकेचे क्षेपणास्त्र त्या खोलीवर आदळण्यापूर्वी दहाच मिनिटे जवाहिरी तेथून बाहेर पडला होता. 'फेडरली ऍडमिनिस्टर्ड ट्रायबल एरिया' (फाटा) या भागात पाकिस्तानच्या सरकारचे फारसे अस्तित्व नाही. याच भागामध्ये 2005 पासून जवाहिरीचे वास्तव्य आहे, असा दावा 'न्यूजवीक'ने केला आहे. 

'जवाहिरीचे लग्न झाले असून त्याला 'आयएसआय'ने नवे घरही दिले आहे,' असा दावा 'द एक्‍झाईल : द स्टनिंग इनसाईड स्टोरी ऑफ ओसामा बिन लादेन अँड अल कायदा' या आगामी पुस्तकात करण्यात आला आहे. 'सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जवाहिरीसाठी कराची ही सर्वांत सुरक्षित जागा आहे. कारण लादेनप्रमाणे अमेरिका कराचीमध्ये घुसून जवाहिरीला ठार करू शकत नाही,' असेही यात म्हटले आहे. तसेच या पुस्तकात नमूद करण्यात आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, लादेनचा 26 वर्षीय मुलगा हम्झा यालाही 'आयएसआय'ने संरक्षण दिले आहे आणि आता 'अल कायदा'मध्ये त्याचे स्थान हळूहळू भक्कम होत चालले आहे. 

Web Title: Pakistan's ISI is shielding Al Qaeda's Ayman Al-Zawahiri in Karachi