esakal | ‘पेगॅसस’चा जगभरात धुमाकूळ
sakal

बोलून बातमी शोधा

Pegasus

‘पेगॅसस’चा जगभरात धुमाकूळ

sakal_logo
By
पीटीआय

बोस्टन - ‘लीक’ झालेल्या माहितीच्या (Information) आधारावर जगभरातील काही माध्यमांनी (Media) शोधमोहिम राबवित, स्पायवेअरच्या मदतीने पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. भारतातील सुमारे ४० पत्रकारावर (Reporter) ‘संभाव्य लक्ष्य’ म्हणून पाळत ठेवली जात असल्याचे काल (ता. १८) स्पष्ट झाल्यानंतर याबाबतची अधिक माहिती उघड झाली आहे. (Pegasus is World Famous)

इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने तयार केलेल्या ‘पेगॅसस’ या लष्करी दर्जाच्या स्पायवेअरचा वापर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आला. ही बाब पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी उघडकीस आणली. त्यांना ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच मिळाली. त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना ही बाब सांगितली. या सर्वांनी शोध घेतला असता ५० देशांमधील एक हजारहून अधिक जणांवर पाळत ठेवण्यासाठी त्यांची नावे निश्‍चित केल्याचे सिद्ध झाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या झाल्यानंतर चार दिवसांनंतर त्यांच्या मैत्रिणीच्या मोबाईलमध्येही हा स्पायवेअर सोडण्यात आल्याचा दावा ‘ॲम्नेस्टी’ने केला आहे.

हेही वाचा: ब्रिटनने सर्व कोरोना निर्बंध हटवले; धाडस कशाच्या जीवावर?

यांच्यावर पाळत

१८९ पत्रकार, ६०० हून अधिक राजकीय नेते, सरकारी अधिकारी, ६५ उद्योगपती, ८५ मानवाधिकार कार्यकर्ते, काही देशांचे प्रमुख. द असोसिएटेड प्रेस, रॉयटर्स, सीएनएन, द वॉल स्ट्रिट जर्नल, फायनान्शिअल टाइम्स यांच्यासह भारतातील इंडिया टुडे, द वायर, हिंदुस्तान टाइम्स आणि इतर काही वृत्तसंस्थांच्या वरीष्ठ पत्रकारांचे मोबाईल क्रमांक लीक झालेल्या यादीत आहेत. अमेरिका, फ्रान्स, हंगेरी, भारत, अझरबैजान, कझाखस्तान, पाकिस्तान, मेक्सिको, सौदी अरेबिया या देशांमध्ये ‘पेगॅसस’चा वापर झाला आहे. केवळ हुकुमशाही देशांनीच नव्हे तर भारत आणि मेक्सिकोसारख्या लोकशाहीवादी देशांनीही राजकीय कारणांसाठी या स्पायवेअरचा वापर केल्याचे अहवालात म्हटले आहे.

पाळत कशी ठेवली जाते?

‘पेगॅसस’ स्पायवेअर स्मार्टफोनमध्ये घुसल्यावर ते त्या फोनमधील खासगी माहिती आणि लोकेशन हॅक करते. तसेच, स्मार्टफोनच्या मायक्रोफोन आणि कॅमेरावरही नियंत्रण मिळविते. या स्पायवेअरच्या विशिष्ट प्रोग्रॅममुळे तो स्मार्टफोनमध्ये असल्याचे समजत नाही आणि गुप्तपणे त्याद्वारे माहिती चोरली जाते किंवा पाळत ठेवली जाते. या व्यक्ती फोनवर जे काही संभाषण करतील, माहिती साठवतील, ती सर्व चोरली जाते. ज्याच्यावर पाळत ठेवायची आहे, त्याच्या स्मार्टफोनमध्ये ‘पेगॅसस’ सोडण्याची ‘एनएसओ’ची पद्धत इतकी आधुनिक आहे की, त्यांना त्या युजरबरोबर कोणत्याही मार्गाने संपर्क करण्याची गरज पडत नाही (झिरो क्लिक ऑप्शन).

हेही वाचा: कोरोनात आता नवं संकट; चीनमध्ये Monkey B विषाणूचा पहिला बळी!

‘एनएसओ’विरोधात खटले

व्हॉट्‌सॲप, फेसबुक या कंपन्यांनी दोन वर्षांपूर्वी ‘एनएसओ’विरोधात खटला दाखल केला होता. मिस्ड कॉलचा वापर करून १४०० युजरच्या मोबाईल फोनमध्ये घुसखोरी झाल्याचा दावा ‘व्हॉट्‌सॲप’ने केला होता. इस्राईल आणि सायप्रसमध्येही या कंपनीविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यांच्याविरोधात इतरही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

‘एनएसओ’ला आरोप अमान्य

‘पेगॅसस’ची निर्मिती करणाऱ्या इस्राईलच्या ‘एनएसओ ग्रुप’ने त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत. आपण केवळ सरकारी संस्थांनाच या स्पायवेअरची विक्री केली असल्याचा दावा केला आहे. ‘फॉर्बिडन स्टोरीज्‌’चा अहवाल खोटा असल्याचा दावाही या कंपनीने केला आहे. ‘एनएसओ’ आपल्या खरेदीदारांची नावेही जाहीर करत नाही. मात्र, दहशतवाद्यांचे आणि तस्करांचे जाळे नष्ट करण्यासाठी विविध देशांना ‘पेगॅसस’ची विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image