
कोरोना महासंकटाशी लढणासाठी आपत्कालीन परिस्थितीत लसीला मान्यता देऊन लसीकरण सुरु करणाऱ्या देशांमधील पहिल्या काही देशांमध्ये इस्त्रालय हा देश होता.
नवी दिल्ली : कोरोना महासंकटाशी लढणासाठी आपत्कालीन परिस्थितीत लसीला मान्यता देऊन लसीकरण सुरु करणाऱ्या देशांमधील पहिल्या काही देशांमध्ये इस्त्रालय हा देश होता. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वत: फायझर कंपनीची लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेला सुरवात केली होती. मात्र, आता इस्त्रायलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फायझर-बायोनटेकची लस घेतल्यानंतर 12,400 लोक कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत. यापैकी 69 लोकांनी लसीचा दुसरा खुराक घेतला होता.
इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने फायझर लसीच्या लसीकरणानंतर 189,000 लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या. यामधील 6.6 टक्के लोक हे कोरोना संक्रमित आढळले आहेत. कोरोना महामारीचे राष्ट्रीय समन्वयक नॅचमन ऍश यांनी म्हटलंय की, आधी जितका विचार केला त्याहून फायझरची लस कमी परिणामकारक आहे.
हेही वाचा - Video: भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी शपथ घेतली अन् इतिहास घडला!
19 डिसेंबर रोजी इस्त्रायलने कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात केली. यामध्ये वयस्कर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास एक चतुर्थांश नागरिकांना आतापर्यंत फायझरची लस दिली गेलीय. फायझरच्या या लसीचा पहिला खुराक जवळपास एक चतुर्थांश लोकांना दिला गेला असून यातील 3.5 टक्के लोकांना लसीचा दुसरा खुराक देखील देण्यात आला आहे.
एका महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये आतापर्यंत 9 दशलक्ष लोकांपैकी 2.2 दशलक्ष लोकांना लस दिली गेली आहे. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या इस्त्रायल देशातील संक्रमणाची गती अजूनही जास्त आहे. जेंव्हापासून ही महामारी सुरु झालीय तेंव्हापासून आतापर्यंत पाच लाख लोक संक्रमित झाले आहेत. तर 4005 लोकांचा मृत्यू झाला आहे.