Video: भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी शपथ घेतली अन् इतिहास घडला!

टीम ई-सकाळ
Thursday, 21 January 2021

अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही महिलेला उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकता आलेली नव्हती.

Joe Biden Inauguration: वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आणि आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी बुधवारी (ता.२०) इतिहास रचला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या त्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. तसेच अमेरिकेच्या सर्वोच्च पदांवर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत. हॅरिस हे अमेरिकन राजकारणातील एक नावाजलेले नाव असून त्यांचं भारताशी वेगळं नातं देखील आहे. 

टीम इंडियाच्या कसोटी विजयानंतर मोदींचा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना रिप्लाय​

कोण आहेत कमला हॅरिस?
कमला या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. शिवाय त्या भारतीय वंशाच्या आणि दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. 55 वर्षांच्या कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियामधील ऑकलंडचा आहे. त्यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित होऊन अमेरिकेत आलेले आहेत. आई श्यामला यांचा जन्म भारतातला आहे आणि वडिलांचा जमैकातला. श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचे आईवडील विभक्त झाल्याने नंतर कमला आणि त्यांची बहिण माया यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला. 

भारताशी असलेलं नातं
कमला यांचा कायमच त्यांच्या भारतीय मुळाशी संपर्क आला आहे. आईसोबत त्या भारतातही येत असत. आईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या अभिमानाने सांगतात. अमेरिकेतल्या भारतीयांना कमला या त्यांच्यापैकीच एक यासाठी वाटतात. 2014मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं. 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाचा इतिहास; कुणी किती शब्दांत आणि मिनिटांत भाषण आटोपलं?

शैक्षणिक आणि राजकीय कारकीर्द 
अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कमला यांनी 4 वर्षं शिक्षण घेतलं आहे. हार्वडमधल्या शिक्षणानंतर कमला हॅरिस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अल्मेडा काऊंटीच्या डिस्ट्रीक्ट ऍटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली. 2003साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट ऍटर्नी झाल्या. 2017 साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. 

कमला हॅरिस यांनी गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराच्या शर्यतीत आपण असल्याचंही जाहीर केलं होतं. ब्लॅक लाईव्हज मॅटरच्या चळवळीत देखील कमला यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. यंत्रणांमध्ये असणारा वर्णभेद मोडून काढायला हवा, असं त्यांनी अनेकदा मांडलं आहे. अमेरिकेतल्या वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण योग्य असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलं आहे.

भारत-अमेरिका मैत्रीचं नवं पर्व; PM मोदींचा US राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना खास संदेश!​

हॅरिस यांनी याआधीही केलाय पराक्रम
अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही महिलेला उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकता आलेली नव्हती. याआधी दोन महिलांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवलेली आहे. १८८४मध्ये गिराल्डिन फेरारो यांनी डेमोक्रॅटिककडून, तर २००८मध्ये सारा पॅलिन यांनी रिपब्लिकनकडून निवडणूक लढविली होती. पण या दोघींना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकत इतिहास घडवला. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamala Harris scripts history as first female US Vice President