कोरोनासंबंधी मोठी अपडेट; सरकारची मंजुरी मिळाली की लस बाजारात

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 18 November 2020


फायझर कंपनीच्या लसीच्या परिक्षणात अमेरिकेसह पाच देशांतील 44,000 लोकांचा समावेश करण्यात आला होता.

वॉशिंग्टन- फार्मा कंपनी फायझरने Pfizer बुधवारी माहिती दिलीये की, अंतिम विश्लेषणामध्ये कोविड-19 लस 95 टक्के प्रभावी आहे. याच बरोबर फायझर प्रमुखांनी म्हटलंय की, कंपनी एका दिवसाच्या आता लशीच्या मंजुरीसाठी अर्ज करेल. फायझर कंपनीच्या या घोषणेमुळे मोठी आशा निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

काही दिवसांपूर्वीच कंपनीकडून लशीच्या प्रवाभीपणाबाबत घोषणा करण्यात आली होती. फायझरची लस कोरोना विषाणूला रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. फायझरच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कंपनीचे अभिनंदन केले होते. तसेच अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळाली होती.

एक दिवसात 50 हजार कोटींनी वाढली संपत्ती; जगातील सर्वात श्रीमंतामध्ये थेट...

फायझर कंपनीच्या लसीच्या परिक्षणात अमेरिकेसह पाच देशांतील 44,000 लोकांचा समावेश करण्यात आला होता. फायझर आणि जर्मनीची तिची सहाय्यक कंपनी बायोएनटेकही कोविड लस निर्माण करण्याच्या शर्यतीत आहे. फायझर कंपनीकडून सांगण्यात आलंय की, ''कोविड लशीने तिसऱ्या टप्प्प्यातील चाचणीमध्ये सर्व आवश्यक लक्ष्य गाठले आहे. 170 स्वयंसेवकांमध्ये लशीचा डोस दिल्यापासून 28 दिवसांपर्यंत प्रतीकारशक्ती दिसून आली आहे. लस 95 टक्के प्रभावी आढळून आली आहे.'' 

फायझरसह अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लस प्रभावी असल्याचे जाहीर केले आहे. मॉडर्नाने दावा केला आहे की, त्यांची कोरोनावरील लस 94 टक्के प्रभावी ठरली आहे. मॉडर्नाच्या या दाव्यामुळे आता जगाला लवकरच लस मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी जगातील काही देशांमध्ये पुन्हा उद्रेक होताना दिसत असून दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मॉडर्ना, फायझरसह ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनका या कंपन्या कोरोनाची लस तयार करण्यामध्ये आघाडीवर आहेत. भारतात सीरम, भारत बायोटेक यासह आणखी काही कंपन्या कोरोनाची लस तयार करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Phase 3 study of COVID19 vaccine candidate has met all primary efficacy endpoints Pfizer Inc