पंतप्रधान मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

modi
modi

माले : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'निशान इझुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज (शनिवारी) दिली. विदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पंतप्रधान मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर असून ते शनिवारी मालदीवच्या संसदेला संबोधित करतील.

पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर मोदींचा हा पहिला परदेश दौरा ठरला आहे. द्वीप राष्ट्रसमूहातील मालदीव हा एकमेव देश आहे, ज्या देशाला मोदींनी पहिल्या कार्यकाळात भेट दिली नव्हती. मार्च महिन्यात माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी द्वीप राष्ट्रांना भेटी दिल्या होत्या.

दोन दिवसीय भेटीदरम्यान मोदी मालदीवचे राष्ट्रपती सोलिह, उपराष्ट्रपती फैसल नसीम आणि माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले की, विविध क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्याचा दोन्ही देशांचा हेतू असणार आहे. यावेळी मोदी आणि सोलिह हे एकत्रितपणे समुद्र किनाऱ्यावरील रडार प्रणालीचे उद्घाटन करतील. हिंदी महासागरातील समुद्री सहकार्य आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी ही रडार प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. 

गोखले पुढे म्हणाले की, कोची ते मालदीव या समुद्री मार्गावर फेरी सेवेसह अनेक विकास प्रकल्प विचाराधीन आहेत. दोन्ही देशांनी खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना देण्यासाठी पुढील वर्षी 'मालदीव-इंडिया बिझिनेस फोरम' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रिकेटसाठी भारताने मदत करावी; मालदीवची मागणी

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, सोलिह सरकारने भारताकडे क्रिकेट मैदान तयार करण्याची विनंती केली आहे. एप्रिलमध्ये सोलिह बेंगलुरूमधील एका आयपीएल सामन्याला उपस्थित राहिले होते. त्यांनी मालदीवमध्ये क्रिकेट संघ विकसित आणि प्रशिक्षित करण्यात भारताने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com