"पंतप्रधान मोदी एक महान नेता, भारतीय-अमेरिकी मलाच मत देतील"

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 5 September 2020

अमेरिकेत २० लाख भारतीय-अमेरिकी नागरिक राहतात. यांची मतं आपल्याकडे ओढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे

वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका २ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बाडयेन यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. अमेरिकेत २० लाख भारतीय-अमेरिकी नागरिक राहतात. यांची मतं आपल्याकडे ओढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. तसेच भारतीय-अमेरिकी नागरिक मलाच मत देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय महिलांबद्दल गलिच्छ वक्तव्य; अमेरिकेच्या माजी अध्यक्षाचा भारतद्वेष...

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आल्याने ट्रम्प यांनी पुन्हा मोदींची आठवण काढली आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय लोकांची स्तुती केली. मला भारतीयांचा  आणि पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा आहे. त्यामुळे मला वाटतं की येथील भारतीय-अमेरिकी नागरिक मलाच मतदान करतील. कोरोना महामारी सुरु होण्याआधी मी भारतात गेलो होतो. भारतीय लोक अद्भूत आहेत. तुम्हाला एक महान नेता मिळाला आहे. मोदी एक महान व्यक्ती आहेत. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय-अमेरिकी मलाच मतदान करतील, असं ट्रम्प म्हणाले. 

ट्रम्प यांनी केली मोदींचे कौतुक

निवडणुकामध्ये भारतीय-अमेरिकी नागरिकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांनी भारतीय वंशाच्या मतदारांवर आपले लक्ष केंद्रीत केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात ह्यूस्टन येथे आयोजित करण्यात आलेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाची आणि फेब्रुवारी महिन्यातील आपल्या भारत दौऱ्याच्या आठवणी जागा केल्या. तसेत पंतप्रधान मोदी आणि ते किती चांगले मित्र आहेत, याचीही उजळणी ट्रम्प यांनी यावेळी केली.

"लॉकडाऊनचा काहीही फायदा न झालेला भारत एकमेव देश"

चीन विरोधात भारताला मदत करण्यास तयार

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी भारत आणि चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावाचा उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले की, उभय देशांमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी अमेरिका मदत करण्यासाठी तयार आहे. तसेच दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवला जाऊ शकतो, असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी यावेळी कोरोना महामारीच्या मुद्द्यावरुन चीनवर टीका केली. कोरोना विषाणूमुळे १८८ देशांमध्ये हाहाकार माजला आहे. हे सर्व चीनमुळे होत आहे. जग कोरोना विषाणूने हैराण झाला आहे, या मागे चीनचा डाव आम्ही जाणून आहोत, असं ते म्हणाले.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi is great leader indian americans vote for me said donald trump us election