आता ब्राझिलमध्येही 'जॉर्ज फ्लॉईड'; कृष्णवर्णीय महिलेच्या गळ्यावर पाय ठेवून उभा पोलिस

कार्तिक पुजारी
Wednesday, 15 July 2020

अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येमुळे सुरु झालेलं आंदोलनाचं सत्र अजून थांबलं नसताना ब्राझिलमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्राझिलिया- अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येमुळे सुरु झालेलं आंदोलनाचं सत्र अजून थांबलं नसताना ब्राझिलमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्राझिलमधील साओ पाऊलो शहरात एक पोलिस अधिकारी 51 वर्षीय कृष्णवर्णीय महिलेच्या गळ्यावर पाय ठेवून उभा ठाकल्याचं दिसत आहे. यामुळे त्या महिलेच्या गळ्याचे हाड मोडले असून तिला 16 टाके पडले आहेत. या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली आहे.

चिनी कंपन्यांचे वागणे ईस्ट इंडिया कंपनीसारखे; अमेरिकेचा पुन्हा हल्लाबोल
समाज माध्यमे आणि ब्राझिलच्या प्रत्येक वृत्त वाहिनीवर या घटनेचे छायाचित्र दाखवले जात आहेत. तसेच पोलिस महिलेच्या गळ्यावर पाय ठेवून उभा ठाकल्याचे छायाचित्र जगभर व्हायरल होत आहेत. छायाचित्रांमध्ये दोन पोलिस दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 30 मे रोजीची ही घटना आहे. महिला विधवा असून तिला 5 मुलं आहेत. पोटापाण्यासाठी ती एक छोटासा बार चालवते. पोलिस महिलेच्या मित्राद्वारे झालेल्या गोंधळाच्या तक्रारीवरुन तेथे आले होते. 

रुग्णालयात भर्ती असणाऱ्या महिलेने स्वत:वर गुदरलेला प्रसंग सांगितला.  पोलिसांनी त्याला हातकडी लावून मारहाण सुरु केली होती. त्यामुळे मी त्याला वाचवण्यासाठी पुढे आले. मी पोलिसांना विनवणी केली की त्याला मारु नका. मात्र, एका पोलिसाने मला धक्का दिला, त्यामुळे मी रस्त्यावर पडले. त्याने माझ्या गळ्यावर पाय ठेवला. मला श्वास घेणेही अवघड झाले होते. मी त्याच्या तावडीतून जितका सुटण्याचा प्रयत्न करत होते, तितक्याच जोरात तो पोलिस माझा गळा दाबत होता, असं महिलेनं सांगितलं आहे. 

अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ट्रम्प सरकारकडून आदेश...
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांची पोलिसांकडून हत्या झाली होती. एका पोलिसाने फ्लॉईड यांच्या गळ्यावर आपला गुडघा 
ठेवला होता. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण येते होती. फ्लाईड यांनी मला श्वास घेता येत नाही असा आर्जवही पोलिसांसमोर केला, पण पोलिसाने त्यांच्या गळ्यावरील पाय काही काढला नाही. अखेर फ्लॉईड यांचा या कारवाईत मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होताच अमेरिकी नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरु लागले. लोकांनी 'ब्लॅक लाईव्ह मॅटर' हे आंदोलन छेडले. जगभरातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police stand with their feet on the neck of a black woman in brazil