प्रचाराला वेग : कोरोनावरून दोन्ही उमेदवारांत दावे-प्रतिदावे

वृत्तसंस्था
Monday, 26 October 2020

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांनी अमेरिकेतील महत्त्वाच्या राज्यांमध्ये प्रचार मोहिमेस वेग दिला.

सर्कलव्हिले (ओहिओ) / डल्लास - कोरोनाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेची बाजू वरचढ होत असल्याचा दावा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला; तर ट्रम्प प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यास हिवाळ्यात संसर्ग अधिक फैलावणार असल्याचा इशारा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी दिला. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांनी अमेरिकेतील महत्त्वाच्या राज्यांमध्ये प्रचार मोहिमेस वेग दिला. ज्यो बायडेन यांनी पेनिसिल्विनिया येथे दोन ‘ड्राईव्ह इन’ सभा घेतल्या. यावेळी उपस्थितांनी आपल्या कारच्या काचा बंद ठेवल्या होत्या, तसेच प्रत्येक वाहनात जास्तीत जास्त चौघे होते. ट्रम्प यांनी सभागृहात सभा घेतली. यावेळी हजारो ट्रम्प समर्थक उपस्थित होते. 

हेही वाचा : हिवाळ्यात कोरोनाचे आव्हान अधिक; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आवाहन

श्रीमंत मित्रांच्या मदतीसाठी ट्रम्प रिंगणात - ओबामा
डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःसाठी आणि त्यांच्या श्रीमंत मित्रांना मदत करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला. ज्यो बायडेन यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ट्रम्प यांना नागरिकांची कोणतीही काळजी नाही. ते केवळ श्रीमंत मित्रांसाठी निवडणूक लढवत आहेत. 

हेही वाचा  : राजधानी दिल्ली : बहुमताची एकाधिकारशाही

बायडेन यांच्याकडून टीव्ही जाहिरातींवर खर्च 
ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाची निवडणुकीत दूरचित्रवाणीवरील जाहिरातींवर आतापर्यंत ५८ कोटी २७ लाख डॉलर खर्च केल्याची माहिती अभ्यासकांनी दिली. त्यांनी या स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांना २५ कोटी डॉलरने मागे टाकले असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. निवडणूक खर्चात वाढ झाल्याने बायडेन यांनी ऑगस्टपासून टीव्ही जाहिरातींवरील खर्च वाढवला.

अग्रलेख : कायद्याचे भय गेले कुठे?

न्यूयॉर्कमध्ये मतदानासाठी रांगा, ट्रम्प यांनीही केले मतदान
ट्रम्प यांनी आपला पत्ता न्यूयॉर्कहून फ्लोरिडात गेल्या वर्षी हलवला आहे. ट्रम्प यांच्यासह ५ कोटी ६० लाख अमेरिकी नागरिकांनी पहिल्या दिवशी मतदान केले. न्यूयॉर्कमध्ये तर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांनी केंद्रावर गर्दी केल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. पहिल्या दिवसाचा उत्साह पाहता अमेरिकेतील मतदानाची शंभर वर्षातील सर्वाधिक टक्केवारी नोंदली जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: presidential election 2020 Claims against both candidates from Coronavirus