esakal | अग्रलेख : कायद्याचे भय गेले कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

police

प्रत्येक घटना ही कायद्याचे राज्य या संकल्पनेस हादरा देणारी असून, अंतिमतः ती प्रत्येक नागरिकाच्या न्यायाच्या अधिकाराशी आणि सुरक्षेशी निगडित आहे. त्यामुळेच त्या घटनांच्या मुळाशी जाऊन विचार करावा लागेल.

अग्रलेख : कायद्याचे भय गेले कुठे?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आपल्याकडे कायद्याचे राज्य असून, आपला समाज कायदाप्रेमींचा आहे असे मिथक मनाशी बाळगलेल्या आपणांस परवा पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांनी मोठा धक्का बसणे स्वाभाविकच होते. हे दोन्ही प्रसंग मुंबई व परिसरातील. त्यातील एका घटनेत एका पोलिसावर गुंडांच्या टोळीने तलवार आणि कोयत्याने वार केले. त्या गुंडांना अडविण्याचे धाडस त्याने दाखविले याची शिक्षा म्हणून तो प्राणघातक हल्ला. दुसऱ्या घटनेत वाहतूक पोलिसास दोन महिलांनी मारहाण केली. ते का, तर त्याने हेल्मेट न घातल्याचा जाब विचारला म्हणून. या अशा घटनांतील नावीन्य आता संपलेले आहे. तरीही तसे काही झाले की आपण सारे कायदाप्रेमी त्यांचा संतप्त वगैरे निषेध करतो आणि कामास लागतो. वस्तुतः असा प्रत्येक हल्ला, अशी प्रत्येक घटना ही कायद्याचे राज्य या संकल्पनेस हादरा देणारी असून, अंतिमतः ती प्रत्येक नागरिकाच्या न्यायाच्या अधिकाराशी आणि सुरक्षेशी निगडित आहे. त्यामुळेच त्या घटनांच्या मुळाशी जाऊन विचार करावा लागेल.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याची सुरुवात करावी लागेल ती भ्रष्टाचारापासून. तो पोलिस दलातील भ्रष्टाचार एवढ्यापुरताच मर्यादित नाही. त्याची व्याप्ती मोठी आहे. कायदे वाकविणे आणि मोडणे यास आपल्याकडे मोठी सामाजिक मान्यता असून, आता तो आपल्या संस्कृतीचा भाग बनलेला आहे ही बाब लक्षात घेतली, म्हणजे हा भ्रष्टाचार किती खोलवर गेलेला आहे याची जाणीव होईल. कायदा मोडून समाजात मानमरातब मिळविणाऱ्या व्यक्ती- मग ते नेते असोत वा गल्लीतले गुंड - यांच्यावर घराच्या चार भिंतींत आपण कदाचित टीका करीत असू. वेळप्रसंगी समाजमाध्यमांतून त्याविरोधात मतांच्या चार पिचकाऱ्याही टाकत असू; परंतु सार्वजनिक जीवनात नेहमीच अशा कायदेभंग करणाऱ्या दबंगांच्या दादागिरीकडे कौतुकाने पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही. याला सामाजिक भ्रष्ट-आचार असे म्हणतात हेच आपण विसरलो आहोत. हेच आपले सामाजिक वास्तव आहे. या अशा पर्यावरणात कायद्याबाबत आदराची भावना कुठून येणार आणि मुळात कायद्याचेच हे होत असेल, तर त्याचे रक्षण करणाऱ्यांकडे कोण आदराने पाहणार? अशा समाजात कायद्याचे व म्हणून पोलिसांचे भय कोणास असते, तर ते केवळ सत्ताहीन सामान्यांना. हेच सत्ताहीन जेव्हा पोलिसांवर हात उचलू धजावतात तेव्हा मात्र परिस्थिती फारच गंभीर बनलेली आहे असे म्हणावे लागेल.

हेही वाचा- सत्ता आल्यास नितीश कुमारांना तुरुंगात टाकणार- चिराग पासवान

गत शुक्रवारी अंबरनाथमध्ये पोलिसावर ज्यांनी शस्त्रे चालविली ते सारे गुंडच होते. अशा प्रवृत्तीकडून झालेल्या हल्ल्यांकडे व्यावसायिक जोखीम या नजरेनेच पोलिस पाहतात. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असला पाहिजे हे खरे असले, तरी काही माथेफिरू लोक एकटा-दुकटा बिनहत्यारी पोलिस शिपाई पाहून त्यावर चालून जाण्यास कमी करीत नाहीत. त्यांना नंतर कायद्याचे नीटच ‘भान’ आणून दिले जाते. मुद्दा सत्ताहीन सामान्यांचा आहे. मुंबईत वाहतूक पोलिसावर हल्ला करणारी स्त्री ही सामान्य कुटुंबातील होती. तिच्यात हे धाडस कुठून आले हा सवाल आहे. आणि त्याची उत्तरे पुन्हा आपल्याला आपल्या सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरणातच शोधावी लागतील. ज्यांच्या हाती सत्ता- मग ती राजकीय असो, पैशांची असो वा वशिलेबाजीतून आलेली असो- त्यांच्यापुढे लोळण घेणारे कायद्याचे रक्षक दुसरीकडे सामान्यांना मात्र तुच्छतेने वागवित असतात, त्यांच्यावर अन्याय करीत असतात हे अलीकडचे सर्वसामान्य चित्र. ही सत्ताहीन जनता ते सतत पाहात आहे. कोरोना-योद्धे म्हणून ज्यांचा रास्त गौरव झाला ते पोलिस महामारीच्या सुरुवातीच्या काळात सामान्य नागरिकांवर कशाप्रकारे लाठ्या चालवत होते हे तिने अनुभवलेले आहे. उत्तर प्रदेशातील पोलिस एका सत्ताहीन कुटुंबातील मुलीवरील बलात्काराची नीट दखलही घेत नाहीत. उलट त्या मुलीचे प्रेत रात्रीच्या अंधारात जाळून टाकतात हे तिने पाहिलेले आहे. अशा विविध घटनांमुळे अतिसामान्यांच्या मनात पोलिस यंत्रणेबाबतच आकस निर्माण झालेला आहे. एरवी ते हतबल असतात, पण मग कधी संधी मिळताच त्यांचाही बांध फुटतो. हे पोलिसांवरील हल्ल्यांचे समर्थन नव्हे. ती परिस्थिती कशातून उद्भवते याच्या आकलनाचा हा प्रयत्न आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केवळ कायद्याचे राज्य म्हणून चालत नसते. तो कायदा न्याय्य आहे आणि सर्वांसाठी सारखा आहे हे सर्वांनाच दिसावे लागते. तसे जोवर दिसत नाही, तोवर त्याबाबतची आदरभावना निर्माण होणे कठीणच. पोलिसांवरील हल्ल्यांच्या मुळाशी आहेत त्या या गोष्टी. पोलिसांचे बळ कमी असणे येथपासून उत्तम ‘पोलिसिंग’चा अभाव येथपर्यंतच्या बाबी तुलनेने दुय्यम. अखेर पोलिस चांगले ‘पोलिसिंग’ करतात म्हणून समाज चांगला असतो असे नव्हे, तर समाज चांगला असतो म्हणून पोलिस चांगले काम करू शकतात. हा चांगला समाज आणि खरेखुरे कायद्याचे राज्य हे एकमेकांवर अवलंबून असते. त्यातील गफलत आपल्याला भोवते आहे. पोलिसांवरील हल्ले हा त्याचा आडपरिणाम, इतकेच.

हेही वाचा- पाकिस्तान-चीनसोबत युद्ध करण्याची तारीख मोदींनी ठरवलीये; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

loading image