बैरुतमध्ये स्फोटानंतर आंदोलनाची आग; अनेक ठिकाणी जाळपोळ

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 9 August 2020

बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर लेबनॉनचे नागरिक सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.

बैरुत- बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर लेबनॉनचे नागरिक सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. हजारो लेबनॉनी नागरिक रस्त्यावर उतरुन निदर्शने करत आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचंही पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. 'राजीनामा द्या किंवा गळफास घ्या' अशी मागणी आंदोलक करत आहेत. 

धमकी देणाऱ्या पाकिस्तानला सऊदी अरेबियाने दिला झटका

लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये स्फोटकांच्या भीषण स्फोटात 150 पेक्षा अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच 6 हजार लोक जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे लेबनॉनी नागरिक सुन्न झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की 120 किलोमीटर दूर असणाऱ्या सायप्रसपर्यंत हादरे बसले होते. गेल्या सहा वर्षांपासून अमोनियम नायट्रेट स्फोटकांचा साठा बैरुतच्या बंदरावर पडून होता. यादरम्यान हा साठा इतरत्र हलवण्यासाठी सरकारने काहीही पाऊलं उचलली नाहीत. यामुळे नागरिकांचा सरकारविरोधात रोष आहे.

हजारो लेबनॉनी नागरिक मंत्रालयासमोर आंदोलन करत आहेत. पंतप्रधान हसन डायब यांनी राष्ट्राला संबोधित करताना  निवडणुका लवकर घेतल्या जातील असं आश्वासन दिलं आहे. तसेच त्यांनी जनतेकडे दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. मात्र, लेबनॉनी जनता काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. त्यांनी राजकीय नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. लोकांना आता या सरकारच्या सत्तेखाली राहायचं नाही, अशी प्रतिक्रिया एका लेबनॉनी नागरिकाने दिली आहे.

जुनागढ नव्या नकाशात दाखवल्यानंतर पाकिस्तानची पुढची चाल; तैनात केली लढाऊ विमाने

नागरिकांचे हे आंदोलन मागिल वर्षी ऑक्टोंबरमध्ये झालेल्या आंदोलनापेक्षा वेगळे आहे. जनता यावेळी मोठ्या ताकदीने पुढे आली आहे. जनतेला आता बदल हवा आहे. सरकारमधील प्रत्येक व्यक्तीने पायउतार व्हावे अशी त्यांची मागणी आहे. आम्हाला आमच्या राजकीय नेत्यांबद्दल घृणा वाटते. प्रत्येक जण देशातील सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया एका 25  वर्षीय आंदोलकाने दिली आहे. 

आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्य आणि पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. निदर्शकांवर अश्रू कांड्या आणि रबर बुलेट फोडण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. स्फोटात जखमी झालेल्या लोकांमुळे बैरुत रुग्णालये गच्च झाली आहेत. आता आंदोलक जखमी झाल्याने रुग्णालयात जागा कमी पडत आहे. सरकारने आंदोलकांविरोधात कडक पवित्रा घेतला आहे. आंदोलकांनीही तयारी केली असून गुन्हेगार सरकारला पुन्हा राज्य न करु देण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protesters In Beirut Turn Fury On Lebanon Leaders