भारताकडून म्यानमारला रेमडेसिव्हिर

पीटीआय
Tuesday, 6 October 2020

म्यानमार या मित्रत्वाचे संबंध असलेल्या शेजारी देशाला मदत म्हणून भारताने रेमडेसिव्हिर या कोरोनावरील औषधाच्या तीन हजार कुप्या दिल्या आहेत. ईशान्येकडील राज्यांतील बंडखोरांचा उपद्रव तसेच चीनविरुद्धच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कृती महत्त्वाची ठरली आहे.

नय प्यी ताव (म्यानमार) - म्यानमार या मित्रत्वाचे संबंध असलेल्या शेजारी देशाला मदत म्हणून भारताने रेमडेसिव्हिर या कोरोनावरील औषधाच्या तीन हजार कुप्या दिल्या आहेत. ईशान्येकडील राज्यांतील बंडखोरांचा उपद्रव तसेच चीनविरुद्धच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कृती महत्त्वाची ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे व परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्यानमार सरकारच्या सल्लागार आंग सान स्यु की यांना सुपुर्द केला. हे दोघे रविवारी दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर दाखल झाले. संपर्क, संरक्षण आणि सुरक्षा यांसह विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याचा या दौऱ्यामागील उद्देश आहे. सोमवारी त्यांनी स्यू की यांची भेट घेतली तेव्हा म्यानमारमधील भारताचे राजदूत सौरव कुमार हेसुद्धा उपस्थित होते. त्यावेळी द्विपक्षीय संबंधांच्यादृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. म्यानमारच्या कोरोनाविरोधी लढ्याला चालना देण्याचाही भारताचा उद्देश आहे. शिरेतून दिले जाणारे हे औषध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील उपचारांमध्येही वापरले जात आहे.

बंडखोरांबाबत आश्वासन
ईशान्येकडील राज्यांत बंडखोरी करणारे काही गट म्यानमारमध्ये आश्रय घेत असल्यामुळे भारताने चिंता व्यक्त केली आहे, मात्र आपल्या प्रांतात कोणत्याही बंडखोराला आश्रय दिला जाणार नाही अशी ग्वाही म्यानमारने दिली आहे. हे आश्वासन कृतीत आणत म्यानमारने अलिकडेच 22 बंडखोरांना भारताच्या हवाली केले. त्याबद्दल श्रृंगला यांनी आभार मानले.

सीटवे बंदराचा मुद्दा
सीटवे बंदर कार्यान्वित करण्यासाठीही उभय देश प्रयत्नशील असून पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत हे उद्दिष्ट साध्य केले जाईल. भारत-म्यानमार-थायलंड यांना जोडणारा त्रिस्तरीय महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही आखण्यात आला आहे. त्यासाठी 69 पूल बांधले जाणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती श्रृंगला यांनी दिली.सिटवे बंदरामुळे भारताला आग्नेय आशियात प्रवेश मिळेल. याशिवाय एका टोकाला असलेली ईशान्येकडील राज्ये मिझोराममधून बंगालच्या उपसागराला जोडली जातील.

दौऱ्याचे महत्त्व

  • पूर्व लडाखमध्ये चीनविरुद्ध झालेला संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जनरल नरवणे, श्रृंगला यांच्या दौऱ्याला महत्त्व
  • गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनरल नरवणे यांचा पहिलाच परदेश दौरा
  • म्यानमार-भारत यांच्यातील एक हजार 640 किलोमीटर सीमा ईशान्येकडील अनेक राज्यांतून जाते, ज्यात बंडखोरीने ग्रासलेल्या नागालँड, मणिपूरचा समावेश
  • उभय देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पातळीवर गेल्या आठवड्यात व्हर्चुअल बैठकीत चर्चा, त्यावेळी द्विपक्षीय संबंधांचा सखोल आढावा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remdesivir from India to Myanmar