Uttarakhand Tunnel Collapse : बोगद्यातील बचावकार्य अखेरच्या टप्प्यात

सिल्क्यारा येथे अडकलेल्या मजुरांची लवकरच सुटका होण्याची शक्यता
rescue operation of 41 laborers trapped in Silkyara tunnel in Uttarakhand has reached its final stage
rescue operation of 41 laborers trapped in Silkyara tunnel in Uttarakhand has reached its final stageSakal

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेसाठी राबविण्यात येत असलेली बचाव मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. आज सकाळी ती काही तास उशिराने सुरू झाली.

घटनास्थळी उपस्थित असलेले पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार आणि उत्तराखंड सरकारचे ओएसडी भास्कर खुलबे म्हणाले, बोगद्याच्या कोसळलेल्या भागात खोदकाम करून मजुरांसाठी मार्ग तयार करणाऱ्या मशिनच्या मार्गातील लोखंडी जाळी आज सकाळी काढण्यात आली. यामुळे ५७ मीटर ढिगाऱ्यामधून मार्ग तयार करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आणि ते सहा तास उशिराने सुरू झाले.

भास्कर खुलबे म्हणाले, की त्यामुळे, काल (ता. २२) संध्याकाळीच मजुरांची सुटका होण्याच्या आशेने काम अथक परिश्रम करणाऱ्या बचाव पथकाच्या उत्साहावर पाणी पडले. मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्याच्या कोसळलेल्या ढिगाऱ्यात खोदकाम करून पाईप टाकण्यात येत आहेत.

पाईपमधील बंदिस्त वातावरणात तसेच ऑक्सिजनच्या अभावात ही जाळी काढणे कठीण होते. या भागात आणखी १२ ते १४ तास खोदकाम केले जाईल. सहा मीटरचा आणखी एक पाईप टाकल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक पाईपमध्ये प्रवेश करून अडकलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत करेल, अशी माहितीही खुलबे यांनी दिली.

या मजुरांना नव्याने टाकलेल्या सहा इंच रुंदीच्या पाईपमधून अन्न, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तू पाठविल्या जात आहेत. मजुरांशी संवाद साधण्यासाठीही याच पाईपचा वापर केला जात आहे.

मशिनचे खोदकाम पुढे सरकत आहे तसे मीटरपेक्षाही कमी रुंदीचे पाईप टाकले जात आहेत. याच पाईपमधून मजुरांना बाहेर काढले जाईल. मदत व बचावकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी ‘एनडीआरएफ’चे महासंचालक अतुल कारवाल, केंद्रीय रस्ते व वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामीही सिल्क्यारात दाखल झाले आहेत.

बोगद्यातील बचावकार्य अगदी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स म्हणाले, की आता दारापर्यंत पोचून तो ठोठावत असल्यासारखे वाटत आहे. दाराच्या दुसऱ्या बाजूला मजूर आहेत. चारधाम मार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या या बोगद्याचा भाग कोसळून ४१ मजूर ११ दिवसांपासून अडकले आहेत.

उपचाराची सुसज्ज तयारी

बोगद्यातून मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावरील उपचारासाठी सुसज्ज तयारी करण्यात आली आहे. या मजुरांना पोलिस संरक्षणात ग्रीन कॉरिडॉरमधून चिनयालिसौर सरकारी रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यासाठी बोगद्याबाहेर ४१ मजुरांसाठी ४१ रुग्णवाहिका तयार असून रुग्णालयांत ४१ खाटाही उभारल्या आहेत.

सिल्क्यारा बोगद्यात आतापर्यंत ४८ मीटरपर्यंत खोदकाम केले असून आणखी दोन पाईप बसविण्याचे आमचे नियोजन आहे. त्यामुळे, आम्हाला ढिगाऱ्यामधून ६० मीटरपर्यंत थोडीशी अधिकची जागाही मिळू शकेल. जर खोदकामात आणखी कोणताही अडथळा आला नाही तर ते गुरुवारी रात्रीपर्यंत संपेल.

-अतुल कारवाल, महासंचालक, एनडीआरएफ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com