
युक्रेनमध्ये आगेकूच सुरुच : रशिया
क्रामातोर्स्क (युक्रेन) - युक्रेनच्या पूर्व भागात अनेक गावे रशियन सैनिकाच्या हाती पडत असून हा संपूर्ण भाग ताब्यात घेण्याच्या उद्देशाकडे रशियाची वाटचाल सुरु आहे, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. कठोर निर्बंध घालून रशियाला शासन करण्याचा युरोपीय देशांनी केलेल्या निश्चयाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपल्या विजयाचा दावा केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, या आठवड्यात लेमन या शहरावर रशियन सैनिकांनी आणि रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी पूर्ण ताबा मिळविला. लेमन या शहरातील रेल्वेस्थानकावरून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले जात होते, तर याच स्थानकावर युरोपीय देशांनी पाठविलेल्या शस्त्रांची रसद आणली जात होती.
दरम्यान, युक्रेनमधील युद्धात युरोपीय देश तेल ओतत असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी केला आहे. पुतीन यांनी फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांशी ८० मिनीटे दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांना शस्त्रे न पाठविण्याबाबत इशारा दिला आहे. तसेच, पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळेच जागतिक अन्न पुरवठा साखळी विस्कळीत झाला असल्याचा आरोपही पुतीन यांनी केला.
झेलेन्स्कींशी थेट चर्चा करा
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत फ्रान्स आणि जर्मनीच्या प्रमुखांनी त्यांच्याकडे तातडीने शस्त्रसंधी करण्याची आणि सैन्य माघारी घेण्याची मागणी केली. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांच्याबरोबर थेट चर्चा करावी, असा आग्रहही दोन्ही नेत्यांनी पुतीन यांना केल्याचे जर्मनी सरकारने सांगितले. रशियाने सैन्य माघारी घेईपर्यंत शस्त्रसंधी करणार नसल्याचे झेलेन्स्की यांनीही जाहीर केले असले तरी, युद्ध समाप्त होण्यासाठी थेट चर्चा होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते.
Web Title: Russia Continues To Advance In Ukraine Russia
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..