रशियाच्या कोरोना लशीची भारतात चाचणी नाहीच; डोस मिळणार की नाही?

टीम ई-सकाळ
Friday, 14 August 2020

जगभरात कोणत्याही रोगावरील लसीच्या तीन-चार टप्प्यात मानवी चाचण्या होतात. पहिल्या टप्प्यात मर्यादित लोकांवर दोन गट करून चाचणी केली जाते.

नवी दिल्ली : संपूर्ण जगाचं लक्ष कोरोनाच्या लशीकडं लागलं असताना, रशियानं (Russia Covid Vaccine) कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केलाय. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जगातील इतर शास्त्रज्ञांनी रशियाच्या लशीवर संशय व्यक्त केलाय. ही लस किती सुरक्षित आहे, या विषयी शंका आहे. त्यातच आता या लसीची भारतात चाचणी होणार नसल्याचंही स्पष्ट झालंय. त्यामुळं ही लस भारतात देण्यात येणार की नाही याविषयी शंका उपस्थित केली जातेय. रशिया गाजावाजा करत असलेल्या लशीची (Sputnik V) भारतात चाचणी घेण्याविषयी कोणतिही विनंती, अर्ज अशी प्रक्रिया करण्यात आलेली नाही, असं लस निर्माण संशोधन संस्थेतील सूत्रांनी सांगितले आहे. जर, चाचणी झाली नाही तर, लस देता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतही रशियाच्या लशीचा मानवी चाचणीचा डेटा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. 

आणखी वाचा - शरद पवार म्हणाले, काळजी करू नका; मी तुमच्या पाठिशी

चाचणीच नाही तर लस कशी देणार? 
जगभरात कोणत्याही रोगावरील लसीच्या तीन-चार टप्प्यात मानवी चाचण्या होतात. पहिल्या टप्प्यात मर्यादित लोकांवर दोन गट करून चाचणी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या वयोगटातील लोकांवर चाचणी केली जाते. तर, तिसऱ्या टप्प्यात जवळपास वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतील लोकांवर लसीची चाचणी करण्यात येते. रशियाच्या लसीविषयी शंका उपस्थित करताना जागतिक आरोग्य संघटनेनं त्या लशीचा मानवी चाचणीचा डेटा मिळाला नसल्यासं सांगितलंय. रशियानं किती जणांवर या लशीची चाचणी केली? तीन टप्प्यांत चाचणी केली का? अशा शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रशियाच्या लशीची त्यांच्या देशाबाहेरील भौगोलिक परिस्थितीत चाचणी करण्यात आलेली नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्यांवर कोरोनाची लस लागू होणार का? अशीही शंका उपस्थित करण्यात आलीय. रशियाच्या लशीवर जगभरातून विरोधी प्रतिक्रिया येत असल्या तरी भारताकडून त्यावर सावधच प्रतिक्रिया देण्यात येत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑक्सफर्डच्या लसीची भारतात चाचणी 
रशियाने पहिली लस शोधल्याचा दावा केला जात असला तरी, जगात ऑक्सफर्डच्या लशीकडं सगळ्याचं लक्ष लागलंय. या लशीची पहिल्या-दुसऱ्या टप्प्यातील चाचणी ब्रिटन आणि भारतात झाली होती. सध्या या लशीची तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील चाचणी भारतात, सुरू आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्यातील करारामुळं ऑक्सफर्डची लस भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सध्या या लशीची भारतात चाचणी सुरू असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भारतात एक पूर्णपणे सुरक्षित लस उपलब्ध होण्याची आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russia covid 19 vaccine Sputnik V no phase 3 trials in India