प्रवासी विमान कोसळून रशियात 71 मृत्युमखी 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

अरुनुगोवो गावातील नागरिकांनी पेटते विमान आकाशातून कोसळत असताना पडत असताना पाहिल्याचा दावा केला. तर विमानाचे अवशेष मोठ्या भागात विखुरले गेल्याचे "इंटरफॅक्‍स' या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोजवळ एक प्रवासी विमान कोसळून 71 जणांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. डोमोडेडोव्हो विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. 

सारातोव्ह एअरलाइन्सचे "अँटोनोव्ह एएन-148' हे विमान ओर्क्‍स शहराकडे चालले होते. मॉस्कोपासून जवळच असलेल्या रामेन्स्की जिल्ह्यांत ते कोसळले. त्यात 65 प्रवासी आणि 6 कर्मचारी होते. विमान कोसळल्यानंतर त्याच्या ज्वाळा लांबवरूनही दिसून येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले. 
रशियाच्या आपत्कालिन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी मदतपथक पाठविले आहे. मात्र हा अपघात एवढा भीषण होता की यातून कोणी वाचले असण्याची शक्‍यता कमी आहे. 

अरुनुगोवो गावातील नागरिकांनी पेटते विमान आकाशातून कोसळत असताना पडत असताना पाहिल्याचा दावा केला. तर विमानाचे अवशेष मोठ्या भागात विखुरले गेल्याचे "इंटरफॅक्‍स' या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

"अँटोनोव्ह एएन-148' हे विमान सात वर्ष जुने आहे. सारातोव्ह एअरलाईन्सने ते वर्षभरापूर्वी दुसऱ्या एका विमान कंपनीकडून विकत घेतले होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनास्थळापर्यंत रस्ताच नसल्याने आपत्कालिन सेवेच्या पथकाला तेथपर्यंत पोहोचणे अवघड गेले. 

डोमोडेडोव्हो विमानतळ हा रशियातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. उड्डाणानंतर दोनच मिनिटांनी विमान रडारवरून गायब झाले, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रशियाच्या परिवहन मंत्र्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैमानिकाची चूक अथवा खराब हवामान या अपघाताला कारणीभूत असल्याची शक्‍यता गृहित धरून तपास सुरू करण्यात आला आहे. 

रशियात विमान अपघातांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हलक्‍या विमानाला अपघात होऊन, सहा जण मृत्युमुखी पडले होते. डिसेंबर 2016मध्ये लष्करी विमान सोचीमध्ये कोसळून 92 जण मृत्युमुखी पडले होते. मार्च 2016मध्ये खराब हवामानामुळे फ्लायदुबई जेट कोसळून 62 जण मृत्युमुखी पडले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia jet carrying 71 people crashes after Moscow take off