मित्रच आला धावून! रशियाने भारतासोबत केला कोरोना लस देण्याचा करार

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 September 2020

कोरोनावरील पहिली लस रशियाने तयार केली आहे.

मॉस्को- कोरोनावरील पहिली लस रशियाने तयार केली आहे. रशिया हा भारताचा जूना आणि चांगला मित्र असल्याने ही लस आपल्याला मिळेल का, असा प्रश्न भारतीयांना पडला होता. त्यातच रशिया नेहमीप्रमाणे भारताच्या मदतीला धावून आला आहे. रशिया भारतासोबत 10 कोटी 'स्पुटनिक v' लशीचे डोस देण्याचा करार करणार असल्याचं कळत आहे. यासंदर्भात भारतातील मोठ्या औषधी कंपन्यांसोबत चर्चा केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नेपाळ हादरले; शास्त्रज्ज्ञ म्हणताहेत ही मोठ्या भूकंपाची चाहूल

रशियाच्या लशीची चाचणी भारतात पार पडणार आहे. चाचणीबरोबरच या लशीचे उत्पादनही सुरु केले जाणार आहे. रशियाच्या डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडने याआधीच कझाकिस्तान, ब्राझील आणि मॅक्सिकोसोबत लस पुरवण्याचा करार केला आहे. रशिया या देशांना एकूण 30 कोटी डोस पुरवणार आहे. रशिया भारताच्या कोणत्या कंपनीसोबत करार करेल, याबाबत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

रशियाने कोरोनावर प्रभावी लस तयार केल्याचे ऑगस्ट महिन्यात जाहीर केले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वत: याबाबतची घोषणा केली होती. ही लस त्यांच्या मुलीला देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. रशियाने अगदी कमी कालावधी स्पुटनिक v लस तयार केल्याने जगभरात चर्चा सुरु झाली. रशियाने मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पार पडण्याआधीच घोषणा केल्याने जगभरातील तज्त्रांनी लशीबाबत संशय व्यक्त केला आहे. चाचणी पूर्ण होण्याआधीच लशीचा डोस नागरिकांना देणे धोक्याचं ठरेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

रशियाच्या वैज्ञानिकांनी 4 सप्टेंबर रोजी लॅन्सेट या प्रसिद्ध जर्नलमध्ये  या लशीसंबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. मानवी चाचणीचा पहिला आणि दुसरा टप्पा पार पाडण्यात आला असून 76 स्वयंसेवकांना स्पुतनिक लस देण्यात आली होती, असं जर्नलमध्ये सांगण्यात आलं होतं. तसेच, या लशीचे कोणतेही गंभीर परिणाम स्वयंसेवकांवर दिसले नाहीत, अशी माहितीही देण्यात आली होती. ही माहिती जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्याने या लशीबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे. रशियामध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी घेतली जात आहे. यात, 40 हजार स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. 

सीरमच्या क्लिनिकल ट्रायलला DCGI कडून परवानगी; पण...

दरम्यान, कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. जगभरातील 100 पेक्षा अधिक उमेदवार कोरोना लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. यातील 8 उमेदवार मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे. भारताच्या तीन कंपन्या मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia to sell 100 million doses of COVID vaccine to India