‘यूएन’च्या शांततेच्या प्रयत्नांना समर्थन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

russia ukraine war crisis UN peacekeeping efforts António Guterres New York
‘यूएन’च्या शांततेच्या प्रयत्नांना समर्थन

‘यूएन’च्या शांततेच्या प्रयत्नांना समर्थन

न्यूयॉर्क : रशियाबरोबरील युद्धात युक्रेनमध्ये शांतता आणि सुरक्षितता राखण्यासंबंधी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा समितीने चिंता व्यक्त केली आहे. तसेच या दोन देशांमधील संघर्षामध्ये शांततेच्या मार्गाने तोडगा शोधण्याच्या ‘यूएन’चे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांच्या प्रयत्नांना समर्थन केले आहे. रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीला पहिला सैनिकी हल्ला केल्यापासून सुरक्षा समितीने प्रथमच सर्वसंमतीने निवेदन प्रसिद्ध केले आहे. या समितीचे अध्यक्षपद या महिन्यात अमेरिकेकडे आहे. तिच्या अध्यक्षतेखालील १५ सदस्य देशांनी शुक्रवारी एक अध्यक्षीय निवेदन जाहीर केले. युक्रेनमध्ये शांतता व सुरक्षितता राखण्याबद्दल निवेदनात चिंता व्यक्त केली आहे.

युक्रेनवर आक्रमणाला ‘युद्घ’ किंवा ‘संघर्ष’ असे न संबोधता ‘यूएन’च्या घटनेनुसार आंतरराष्ट्रीय वाद शांततेने सोडविण्याचे बंधन सर्व सदस्यांवर असल्याची आठवण निवेदनात करून देण्यात आली आहे. गुटेरेस यांच्या शांततापूर्ण उपायांनाही समर्थन देण्यात आले आहे. गुटेरेस यांनी रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्याची आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि झेलेन्स्की यांच्या भेटीची माहिती दिली. सुरक्षा समितीने तयार केलेल्या अध्यक्षीय निवेदनाचे स्वागत गुटेरेस यांनी केले. ‘‘युक्रेनमधील शांततेसाठी सुरक्षा समितीने प्रथमच एकत्रितपणे आवाज उठविला. बंदुकांचा आवाज थांबविण्यासाठी जगाने एकत्र यायला हवे, हे मी सांगत आलो आहे. सुरक्षा समितीच्या पाठिंब्याचे स्वागत करतो,’’ असे ते म्हणाले. जीव वाचविण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी आणि शांततेच्या मार्ग शोधण्यासाठी प्रयत्नांत कसूर सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शियाच्या क्षेपणास्त्राने शनिवारी युक्रेनमधील ग्रेगरी स्कोव्होरोडा राष्ट्रीय संग्रहालयाचा वेध घेतला. अठराव्या शतकातील या तत्त्ववेत्त्याचे कार्य आणि जीवन याला समर्पित असलेले हे संग्रहालय आज आगींच्या ज्वाळांनी वेढले होते.

  • विजयदिनामुळे प्रचंड गोळीबार होण्याची भीती असल्याने किव्हमध्ये गस्त वाढविली

  • दक्षिण युक्रेनमधील ओडेसा भागात संचारबंदी

  • डोनबासमध्ये युक्रेनी सैन्याने ११ हल्ले परतविल्याचा दावा

  • खारकीव्हमधील पाच गावे पुन्हा युक्रेनकडे

  • डोनस्तक भागातील लिमन शहरात रशियाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

नॉर्वे व मेक्सिकोचा पाठिंबा

सुरक्षा समितीच्या अध्यक्षीय निवेदनाचे पालन करण्याचे आश्‍वासन नॉर्वेच्या नॉर्वेचे राजदूतांचे कायमस्वरूपी सदस्य मोना जुल आणि मेक्सिकोच्या राजदूतांचे कायमस्वरूपी सदस्य जुआन रॅमन डी ला फ्युएंट रामीरेझ यांनी दिले आहे. सुरक्षा समिती ‘यूएन’च्या सरचिटणीसांच्या राजनैतिक उपाय शोधण्याच्या पाठीशी असल्याचे चित्र या निवेदनाद्वारे दिसले आहे, असे रामीरेझ म्हणाले.

पन्नास नागरिकांची सुटका

किव्ह : मारिउपोल या युक्रेनच्या महत्त्वाच्या बंदरावर रशियाला संपूर्ण ताबा मिळविण्यापासून रोखण्याचे प्रयत्न युक्रेनचे सैन्य करीत असून तेथील अझोवत्सल पोलाद निर्मिती प्रकल्पातील बोगद्यात आश्रय घेतलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच आहे. तेथे लपलेल्या ११ मुलांसह ५० जणांना शुक्रवारी सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र (यूएन) आणि रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या प्रतिनिधींकडे त्यांना सोपविले आहे.

Web Title: Russia Ukraine War Crisis Un Peacekeeping Efforts António Guterres New York

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top