
BLOG : भय इथले संपत नाही; युद्धातही सुचतेय मस्ती!
रशिया आणि युक्रेनमधला चिघळलेला वाद युद्धापर्यंत येऊन पोहचलाय. या दोन देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झालीये. रशियानं युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवलं असून युद्धातून मागे हटणार नाही, याचे संकेत दिलेत. या युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. दोन्ही देशांतील तणावाचा शेअर बाजाराला (Share Market) फटका बसला. यापुढे तेलाचे भावही वाढू शकतात. रशियाच्या हट्टीपणामुळे जगभरातील सामान्यांना महागाईचाही चटका बसेल. असे एक ना अनेक परिणाम होणार आहेत.
हेही वाचा: Indian Army Jobs : दहावी पास झालेल्यांसाठी इंडियन आर्मीत नोकरीची संधी
ज्या देशात युद्ध चालू असतं त्या देशातील लोकं जिवतं राहावं या आशेने धडपड सुरु करतात. गेली कित्येक वर्ष राहत असलेलं शहर असं एका रात्रीत सोडणं लोकांना अवघड असलं तरी जीव वाचविण्यासाठी त्यांना हे पाऊल उचलावं लागतं. सोशल मीडियावरील काही फोटोच्या माध्यमातून युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांचे होणारे हाल सर्वांसमोर येत आहेत. त्यांची ही अवस्था बघून मनसुन्न होते. पण काहीजण भावनाशून्य असल्याचे चित्र काही व्हायरल होणाऱ्या मीम्समधून दिसून येते.
हेही वाचा: युक्रेनच्या सीमेजवळ NATO वाढवणार तिन्ही दलांची कुमक; तातडीनं दिली मंजुरी
उद्धवस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांच्या भावनांचे, रडक्या अवस्थेचे फोटो काहीजण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. फोटो शेअर करताना त्यांच्यासंदर्भात आपुलकीची भावना वाटणं आणि त्या क्षणाचा असुरी आनंद घेणं यात फरक असतो. हे काहींना समजत नाही. सोशल मीडियावर ज्या मीम्स व्हायरल होत आहेत त्यातून काही लोक भान नसल्यासारखे वागत असल्याचे दिसते. काही नेटकरी व्लादिमीर पुतीन आणि युक्रेन संदर्भात मीम्स तयार करून युद्धासारखी गोष्टही हसण्यावारी घेत आहेत. आपल्याला लोकांच्या भावनांशी काहीच देणं घेणं नाही, आपण भावनाशुन्य झालोय हेच ते दाखूवन देताहेत. गेल्या दोन दिवसात युद्धजन्य परिस्थीतीवर अनेक मीम्स व्हायरल झालेत. हे पाहून लोकांच्या भावनाच संपल्यात का? असा प्रश्न निर्माण होता. तुम्ही म्हणाल की युद्ध आपल्याकडे नाही तर त्या तिथे युक्रेनला चालू आहे. मीम्स केले तर काय बिघडतं? दोन देशांमध्ये कितीही वाद असले तरी अशावेळी भरडली जातात ती त्या देशांतली माणसं. म्हणून आपणही माणूसकी सोडून अशाप्रकारे काहीही मीम्स टाकायला लागलो तर त्याला कोणती मानसिकता म्हणायची? की लोकांच्या दु:खाचे, त्या देशात चालू असलेल्या परिस्थितीची आपण टर उडवायची? जरा माणूस म्हणून याचा विचार करून पाहा.
हेही वाचा: भारताने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी; युक्रेन राजदुतांची PM मोदींकडे याचना

viral memes
आपण दिवसेंदिवस भावनाशून्य झालो आहोत. आपल्याला लोकांच्या दु:खाची मजा बघण्यात जास्त रस आहे, हे यातून दिसून येते. पण असं भावनाशून्य असणं किती धोक्याचं लक्षण आहे हे तुमच्या लक्षात येतंय का? परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या काळजीने इथे काही आयांचा डोळ्याला डोळा लागत नाही. तुमचेही नातेवाईक असे परदेशात असतील आणि त्यांच्यावर घडणाऱ्या वाईट प्रसंगावर असे मीम्स तयार करून लोकांनी तुम्हाला दाखवले तर काय अवस्था होईल तुमची, हे लक्षात ठेवा. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर वाचाळवीरांच्या ज्या फौजा तयार होताहेत त्याची खरंच भिती वाटते. भय इथलं संपत नाही, अशीच काहीशी भावना युद्धामध्ये मस्ती सुचणाऱ्या मीम्स पाहून मनात येते. युद्ध चालू असले तरी लोकांच्या भावना दुखावणे हे योग्य नव्हेच. आपण किमान त्या लोकांना भविष्यात त्यांच्या देशात पुन्हा यायला मिळेल अशी प्रार्थना करूया.
हेही वाचा: 'ही' पाच फळं नियमित खाल्ल्याने वजन होईल कमी!
Web Title: Russia Ukraine War Viral Memes Blog
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..