
लष्कराचा वेढा अभेद्य करा; पुतीन यांचे सैन्याला आदेश
किव्ह : युक्रेनचा पूर्व भाग ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या रशियाने मारिउपोल शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. या शहरातील पोलाद प्रकल्प ताब्यात आला नसला तरी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी आपल्या सैन्याला वेगळीच सूचना दिली आहे. ‘तीव्र हल्ले करू नका, मात्र वेढा असा आवळा की एक माशीही शहराबाहेर पडता कामा नये,’ असे आदेश पुतीन यांनी दिले आहेत.
मारिउपोल शहराचा बराचसा भाग रशियाच्या नियंत्रणात आला असला तरी एका पोलाद प्रकल्पात काही युक्रेनी सैनिक आणि हजारो नागरिक लपून बसले आहेत. या प्रकल्पाला रशियाच्या सैनिकांनी वेढा घातला आहे. पुतीन यांनी मारिउपोलवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे. या पोलाद प्रकल्पावर आता हल्ले न करता वेढा मात्र पक्का करा, अशी सूचना पुतीन यांनी केली आहे. मारिउपोलमध्ये अद्यापही काही हजार नागरिक आहेत. पुतीन यांच्या सूचनेनंतर रशियन सैन्याने वेढा आवळला असल्याने या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडणे अवघड झाले आहे. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर केवळ चार बस शहराबाहेर पडू शकल्या, असे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले.
युद्धाच्या आघाडीवर
स्पेन आणि डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा किव्ह दौरा
रशियाने ग्रीन कॉरिडॉर जाहीर करावेत : युक्रेन
युरोपमधून रशियाला होणाऱ्या निर्यातीत प्रचंड घट
खेरसन, खारकिव्ह शहराची पूर्ण नाकेबंदी
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत रशिया, बेलारुसवर बंदी
अमेरिकेकडून लवकरच लष्करी मदत
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे लवकरच युक्रेनला अतिरिक्त लष्करी मदत जाहीर करणार असल्याचे अमेरिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. युक्रेनला २.६ अब्ज डॉलरचे लष्करी साहित्य पुरविले जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या लष्करी साहित्यामध्ये रणगाडे आणि दारुगोळ्याचा समावेश असेल.
लुहान्स्कचा ८० टक्के भाग रशियाकडे
लव्हिव : युक्रेनचा पूर्व भाग असलेला दोन्बास हा प्रदेश लुहान्स्क आणि दोनेत्स्क या दोन भागांपासून बनलेला आहे. यातील लुहान्स्कच्या ८० टक्के भागावर रशियाने नियंत्रण मिळविल्याचे या भागाचे गव्हर्नर हैदेई यांनी सांगितले. या प्रदेशात रशिया समर्थक बंडखोरांचे वर्चस्व होते. मात्र, हल्ल्यापूर्वी ६० टक्के भाग युक्रेनच्या ताब्यात होता. ८० टक्के भाग रशियन सैन्याच्या नियंत्रणात आहे.
रशियाकडून क्षेपणास्त्राची चाचणी
युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावरून रशियावर जगभरातून दबाव येत असतानाच रशियाने आज ‘सरमॅट’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रवाहू आहे. एक क्षेपणास्त्र दहा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. शत्रूची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा भेदण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. ११ ते १८ हजार किमी असा या क्षेपणास्त्राचा पल्ला आहे. ‘हे अत्यंत सामर्थ्यवान क्षेपणास्त्र असून यामुळे आमचे शत्रू आमच्याविरोधात मोहिम आखताना दोनदा विचार करतील,’ असे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी म्हटले आहे.
Web Title: Russian President Vladimir Putin Make Siege Of Army Impenetrable Kyiv
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..