सौदीत फुटबॉलच्या मैदानावर प्रथमच महिला

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

सौदी अरेबियात महिलांना एकट्याने प्रवास करण्यास मनाई आहे. प्रवासात त्यांच्याबरोबर पुरुष सदस्य असणे आवश्‍यक असते. येथे हॉटेलमध्ये पुरुषांसाठी आणि कुटुंबासाठी असे दोन स्वतंत्र विभाग असतात. महिलांना पती किंवा कुटुंबातील पुरुष सदस्यांसह कौटुंबिक विभागात बसण्यास परवानगी आहे. तसेच पासपोर्टसाठी अर्ज करणे, परदेश प्रवास, विवाहाचा निर्णय, बॅंकेत खाते उघडणे, काही विशिष्ट व्यवसाय सुरू करणे आदींसाठीही महिलांना पुरुषांची परवानगी घेणे किंवा साथ घेणे बंधनकारक आहे.

जेद्दातील स्टेडियमध्ये सामना पाहण्याचा घेतला आनंद

रियाध: सौदी अरेबियात प्रथमच पुरुष खेळाडूंचा फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी महिला दर्शक स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. देशातील हा ऐतिहासिक क्षण होता.
जेद्दामधील पर्ल स्टेडियममध्ये पुरुषांचा फुटबॉल सामना काल खेळण्यात आला. तो पाहण्यासाठी महिलाही उपस्थित होत्या. "फॅमिली' प्रवेशद्वारातून त्यांना स्टेडियममध्ये सोडण्यात आले. खास कुटुंबासाठी तयार केलेल्या कक्षात बसून त्यांनी सामन्याचा आनंद लुटला. सौदी प्रीमियर क्‍लबच्या अल अहिली आणि अल बातिन या संघांमधील ही लढत पाहण्यासाठी काही महिल्या एकट्या, तर काही कुटुंबासह आल्या होत्या.

सौदी अरेबियात महिलांवर अनेक बंधने आहेत. काही महिन्यांपासून त्यातील काही शिथिल करण्यात आली आहेत. यात महिलांना मोटार चालविण्याची परवानगी देण्याचा क्रांतिकारी निर्णयही आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच, चित्रपटांवरील बंदीही हटविण्यात आली. सौदीचे युवराज मोहम्मद सलमान हे देशाला प्रगतीच्या व आधुनिकीकरणाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महिलांवरील काही बंधने हटवून त्यांना स्वातंत्र्य बहाल केले आहे. "शुक्रवारी आणि पुढील गुरुवारी होणारा सामना पाहण्यासाठी महिला स्टेडियममध्ये जाऊ शकतील,' असे सौदीतील सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते.

जेद्दातील स्टेडियममध्ये महिला फुटबॉलप्रेमींचे स्वागत महिला कर्मचाऱ्यांनी केले. त्या तसेच महिला कर्मचारी "अबाया' या पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होत्या. संपूर्ण अंग झाकणारा झगा व बुरखा परिधान करून आलेल्या महिला दर्शक आपापल्या संघाला मोठ्या जल्लोषात, उत्साहात पाठिंबा देत होत्या. या वेळी सोशल मीडियावर "लोक स्टेडियममध्ये महिलांच्या प्रवेशाचे स्वागत करीत आहेत,' हा हॅशटॅग चालविला गेला. यावर दोन तासांत दहा हजार संदेश लिहिले गेले. जैद्दात राहणारी फुटबॉलप्रेमी लामया खालिद नासीर (वय 32) म्हणाली, की या निर्णयाचा मला अभिमान आहे. आमची वाटचाल उज्ज्वल भविष्याकडे सुरू असून, या मोठ्या परिवर्तनाची मी साक्षी असल्याचा आनंद मला वाटत आहे. "सौदी अरेबियासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे,' अशी भावना रुवायदा अली कासिमने व्यक्त केली.

महिला ग्राहकांसाठी मोटार शोरूम
सौदी अरेबियात काल आणखी एक मोठा बदल दिसून आला. मोटार खरेदी करण्यासाठी जैद्यात महिलांसाठी खास स्वतंत्र शोरूम उभारण्यात आली आहे. केवळ महिला ग्रहकांसाठी असणारी ही देशातील पहिली शोरूम आहे.

Web Title: saudi arabia news for the first time, women are on the Saudi football ground