पहिल्या महिला समलिंगी पंतप्रधान, पुन्हा त्यांच्या देशाची धुरा वाहणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 6 October 2020

सर्बियाच्या पहिल्या महिला आणि उघडपणे समलिंगी असलेल्या पंतप्रधान ए‌ॅना बर्नाबिक Ana Brnabic, सलग दुसऱ्यांदा आपल्या पदावर कायम राहणार आहेत.

बेलग्रेड- सर्बियाच्या पहिल्या महिला आणि उघडपणे समलिंगी असलेल्या पंतप्रधान ए‌ॅना बर्नाबिक Ana Brnabic, सलग दुसऱ्यांदा आपल्या पदावर कायम राहणार आहेत. सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या विजयानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्ष आणि सत्ताधारी पक्ष सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीचे प्रमुख अलेक्झाडंर वुकीक Aleksandar Vucic यांच्या हातात खऱ्या अर्थाने सत्ता आहे. अलेक्झाडंर यांनी सोमवारी त्यांच्या नावाची घोषणा केली. 

रिलायन्सनंतर आणखी एका भारतीय कंपनीने ओलांडला 10 लाख कोटी बाजारी भांडवलाचा टप्पा

सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीला संसदेत 250 पैकी 188 जागा मिळाल्या. अलेक्झाडंर यांच्यावर विरोधकांवर दबाव टाकण्याचा आणि माध्यमांची गळचेपी करत असल्याच्या आरोप करत विरोधकांनी 21 जूनच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. 

बर्नाबिक यांनी देशासाठी मोठं काम केलं आहे, असं अलेक्झांडर एका वाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत. तसेच त्या आपल्या नव्या कॅबिनेटची नेमणूक करतील, ज्यात 50 टक्के महिला असतील, असं त्यांनी सांगितलं. अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखालील बर्नाबिक सरकारची मुख्य योजना येत्या दशकामध्ये यूरोपीयन यूनियनमध्ये सामील होण्याची असणार आहे. 

2017 साली ए‌ॅना बर्नाबिक यांच्या निवडीने सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. अलेक्झाडंर वुकीक यांनी पंतप्रधान पदासाठी त्यांचे नाव पुढे केले होते. त्यांच्या निवडीमुळे पुराणमदवादी सर्बियन समाजाला मोठा धक्का बसला होता. मात्र, वुकीक यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता आणि बर्नाबिक यांनीही आपलं कर्तृत्व सिद्ध करुन दाखवलं आहे. 

शरीरात व्हिटॅमिन A ची कमतरता असेल तर करा या पदार्थांचा आहारात समावेश

2019 साली बर्नाबिक यांना फोर्ब्सच्या सर्वाधिक शक्तीशाली महिलांच्या यादीत 88 वे स्थान देण्यात आले होते. शिवाय सर्वाधिक शक्तीशाली राजकीय महिला म्हणून त्यांना 19 वे स्थान देण्यात आले होते. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हातात खरी राजकीय शक्ती नाही. सर्बियामध्ये खरे कार्यकारी अधिकार अध्यक्षांच्या हाती एकवटले आहेत. सध्या अलेक्झाडंर वुकीक राष्ट्राध्यक्ष आहेत. 

(edited  by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serbia first gay prime minister Ana Brnabic gets second term 

Tags
टॉपिकस
Topic Tags: