मोठी उद्दिष्टे निश्‍चित करा | Environmental | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी उद्दिष्टे निश्‍चित करा

मोठी उद्दिष्टे निश्‍चित करा

ग्लास्गो : तापमानवाढीची समस्या गंभीर होत असल्याने सर्व देशांनी २०२२ च्या अखेरीपर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अधिक मोठी उद्दिष्टे निश्‍चित करावीत, असे आवाहन जागतिक हवामान बदल परिषदेत करण्यात आले आहे. या परिषदेचा मसुदा आज जाहीर करण्यात आला.

कार्बन उत्सर्जन बंद करण्यासाठी सर्व देशांनी अधिक गांभीर्याने दीर्घकालिन योजना तयार करून त्याचा आराखडा पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत जाहीर करावा, असे मसुद्यात म्हटले आहे. गरीब आणि हवामान बदलाचा फटका बसलेल्या देशांना इतर देशांनी मदत करावी, असे आवाहनही या मसुद्याद्वारे करण्यात आले आहे.

या मसुद्यावर चर्चा होऊन त्यावर सर्व देशांनी सह्या केल्यावर त्याचे करारात रुपांतर होणार आहे. मसुद्यात वेगळेपण नसले तरी तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यावर भर दिल्याबाबत पर्यावरणवाद्यांनी समाधान व्यक्त केले.

मसुदा केवळ सात पानांचा असला तरी यामध्ये ठोस कृती करण्यावर भर देण्यात आला आहे. अनेक देशांनी यासाठी उद्दिष्टे निश्‍चित केली आहेत. अनेक विकसित देशांनी २०५० पर्यंत कार्बनमुक्ती साध्य करण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा: SpaceXने अंतराळात पाठवले चार प्रवासी; घडला पृथ्वीच्या इतिहासातील अनोखा रेकॉर्ड

‘कॉप-२६’मधील घडामोडी

  • २०४० पर्यंत सर्व वाहने कार्बन उत्सर्जनमुक्त करण्याचा काही देश आणि कंपन्यांचा निर्णय. असा निर्णय घेणाऱ्या कंपन्यांमध्ये फोर्ड, जनरल मोटर्स, मर्सिडिज बेंझ आणि व्होल्व्हो यांचा समावेश

  • कृती करण्यावर भर देण्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचे आवाहन

  • हवामान बदलामुळे विस्थापित होणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचा अमेरिकेचा दावा

  • प्रदूषण कमी करत ऊर्जेची गरज भागविण्यासाठी फ्रान्स नवीन अणुभट्टी उभारणार

  • तंत्रज्ञान विकासासाठी ऑस्ट्रेलियाकडून ७३.८० कोटी डॉलरचा निधी जाहीर

loading image
go to top