पाकमध्ये हिंदू मुलींचे विवाह लावणाऱ्या मौलवीला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 25 मार्च 2019

विवाह लावणाऱ्या मौलवीला सिंध प्रांतातून खानपूर येथे अटक करण्यात आली. त्याने विवाह कोठे लावला, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी पंतप्रधान इम्रान खान यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिले.

लाहोर : पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि विवाह लावणाऱ्या मौलवीसह सात जणांना अटक करण्यात आली. दरम्यान पीडित मुलींनी पंजाब प्रांतातील बहावलपूर न्यायालयात धाव घेऊन संरक्षणाची मागणी केली आहे.

तेरा वर्षीय रवीना आणि पंधरा वर्षीय रीना यांचे घोटकी जिल्ह्यातील घरातून अपहरण केले होते. या अपहृत हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि विवाह करण्यात आला होता. या प्रकरणी पंतप्रधान इम्रान खान यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात विवाह लावणाऱ्या मौलवीला सिंध प्रांतातून खानपूर येथे अटक करण्यात आली. त्याने विवाह कोठे लावला, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. सत्ताधारी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे हिंदू खासदार रमेश कुमार वंकवाणी म्हणाले, की हा मुद्दा आपण आगामी नॅशनल असेंब्लीत मांडणार असून, जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराविरोधात आवाज उठवू. दरम्यान, त्या मुलींनी आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या जिवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven arrested for two Hindu Girls Kidnapped and Converted to Islam in Pakistan