मोदी सरकारची तत्परता; लीबियातून अपहरण झालेल्या 7 भारतीयांची सुखरुप सुटका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

हे सर्व भारतीय मागील महिन्यात 14 सप्टेंबर रोजी भारतात परतण्यासाठी त्रिपोली विमानतळाकडे जात होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

नवी दिल्ली- उत्तर आफ्रिकन देश लीबियामधून अपहरण केलेल्या सात भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. ट्युनेशियातील भारतीय राजदूत पुनीत रॉय कुंदल यांनी याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी मागील महिन्यात सात भारतीयांचे अपहरण केले होते. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात आणि बिहार येथील हे नागरिक होते. 

हे सर्व भारतीय मागील महिन्यात 14 सप्टेंबर रोजी भारतात परतण्यासाठी त्रिपोली विमानतळाकडे जात होते. त्यावेळी लीबियातील अस्सहवेरिफ परिसरातून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. भारताने गुरुवारी अपहरणाच्या वृत्ताला दुजोरा देत सर्वांना सुरक्षितरित्या आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले होते. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी अपहरण केलेल्या नागरिकांना शोधण्याबरोबर त्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे आणण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले होते. हे सर्व अपहत नागरिक लीबिया येथील एका कंपनीत काम करत होते. 

हेही वाचा- सिंगापूरच्या जोडप्यांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज

लीबियात भारतीय दुतावास नाही. शेजारील देश ट्यूनीशियामधील भारतीय दुतावासच लीबियातील भारतीय नागरिकांशी निगडीत प्रकरणांची हाताळणी करते. लीबिया सरकार आणि तेथे असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांशी संपर्क साधून भारतीय नागरिकांना मुक्त करण्यासाठी मदत मागण्यात आली होती. 

हेही वाचा- कोरोनाला घाबरवण्यासाठी कंबोडिया बुजगावणे

दरम्यान, भारत सरकारकडून सप्टेंबर 2015 मध्ये भारतीय नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने लीबियात न जाण्याचा सल्ला दिला होता. मे 2016 मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने लीबियाच्या प्रवासावर बंदी घातली होती. ही बंदी अजूनही लागू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Indians who were kidnapped in Libya have been released