esakal | शेर बहादूर देऊबा नेपाळचे नवे पंतप्रधान; पाचव्यांदा घेतली शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

Sher Bahadur Deuba

शेर बहादूर देऊबा यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून मंगळवारी शपथ घेतली. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने संसदेला विसर्जित करण्याचा निर्णय रद्दबादल ठरवला होता आणि देऊबा यांना पंतप्रधान पदी निवडण्याचे निर्देश दिले होते

शेर बहादूर देऊबा नेपाळचे नवे पंतप्रधान; पाचव्यांदा घेतली शपथ

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

काटमांडू- शेर बहादूर देऊबा यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून मंगळवारी शपथ घेतली. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने संसदेला विसर्जित करण्याचा निर्णय रद्दबादल ठरवला होता आणि देऊबा यांना पंतप्रधान पदी निवडण्याचे निर्देश दिले होते. यानंतर राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी पंतप्रधानपदासाठी देऊबा यांना निमंत्रित केलं. मंगळवारी राष्ट्रपती भवनात 75 वर्षीय देऊबा यांनी पदाची शपथ घेतली. नेपाळी काँग्रेसचे प्रमुख म्हणून त्यांनी पंतप्रधानपदाची पाचव्यांदा शपथ घेतली आहे. (Sher Bahadur Deuba sworn in as Nepal Prime Minister for 5th time)

गेल्या जवळपास वर्षांपासून नेपाळमध्ये राजकीय गोंधळ सुरु होता. देऊबा यांच्या निवडणुकीमुळे राजकीय स्थिरता येण्याची आशा आहे. देऊबा यांच्या शपथविधीआधीही काही प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. शपथविधीला तीन तास उशीर झाला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शेर बहादूर देऊबा यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आल्याचं राष्ट्रपती भंडारी यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हणण्यात आलं होतं. पण, देऊबा यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर संविधानातील तरतुदीनुसार ही निवड झाल्याचे निवेदनात दुरुस्ती करुन सांगण्यात आलं.

हेही वाचा: दुबईत सर्वांत खोल जलतरण तलाव

देऊबा यांच्या निवडीवरुन माजी पंतप्रधान के पी ओली यांनी आक्षेप घेतलाय. देऊबा यांची निवड अयोग्य असल्याचं म्हणत त्यांनी सुप्रीम कोर्टावर टीका केलीय. तसेच जगात आतापर्यंत कोणत्याच कोर्टाने पंतप्रधानाची नियुक्ती केली नाही, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने शेर बहादूर देऊबा यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. संविधानाच्या कलम 76(5) नुसार विश्वासदर्शक ठराव मंजुर करुन घेण्याची क्षमता असणाऱ्या नेत्याची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाते.

हेही वाचा: लस पुरवठा करण्यास अमेरिका तयार, भारत म्हणतंय जरा थांबा

कोण आहेत शेर बहादूर देऊबा?

शेर बहादूर देऊबा यांचा 13 जून 1946 साली झाला. विद्यार्थी असतानाच ते राजकारणात सक्रीय झाले होते. ते नेपाळ काँग्रेसची शाखा असलेल्या नेपाळ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. राजा महेंद्रा यांच्या निरंकूश सत्तेविरोधात आंदोलन केल्याने त्यांना 9 वर्ष तुरुंगवास झाला होता. 1991 मध्ये ते पहिल्यांदा संसदेवर निवडणूक गेले होते. त्यांनी याआधी 1995 ते 1997, 2001 ते 2002, 2004 ते 2005 आणि 2017 ते 2017 या काळात चारवेळा पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आहे. त्यांना कधीही पूर्णवेळ कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. त्यांच्या काळात भारतासोबतचे संबंध सदृढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

loading image