VIDEO - बछड्याच्या मृत्यूनंतर सिंहिणीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

टीम ई सकाळ
Sunday, 24 January 2021

इतरवेळी सिंह जशी डरकाळी फोडतो त्यापेक्षा आक्रोश करत असताना फोडलेली डरकाळी वेगळी ऐकू येते. व्हिडिओ पाहताच भावनिक होऊन डोळ्यातून पाणी येतं.

नवी दिल्ली - आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर दु:ख होतं. माणूस शोक व्यक्त करतो. जवळच्या व्यक्तीचा आक्रोश हा मन हेलावून टाकणारा असतो. पण हे फक्त माणसांमध्येच असतं असं नाही तर प्राण्यांमध्येही या भावना असतात. तेसुद्धा त्यांच्या प्रजातीतील आणि पिलांच्या मृत्यूनंतर असाच शोक व्यक्त करतात. त्यांच्यातील कोणाला त्रास होत असेल तर प्राणीही अस्वस्थ होतात.

एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला तर इतर प्राण्यांना त्याचं दु:ख होतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून एक सिंहिण तिच्या बछड्याच्या मृत्यूनंतर आक्रोश करताना दिसत आहे. हृदय हेलावून टाकणारा असा या सिंहिणीचा आक्रोश आहे.

हे वाचा - हृदयाला स्पर्श करणारी घटना! काश्मिरी पंडिताच्या मृतदेहाला मुस्लीम शेजाऱ्यांनी दिला खांदा

सिंहिणीचं दु:ख व्हिडिओ पाहताच लक्षात येतं. बछड्याजवळ येताच ती रडायला लागते आणि बेचैन झालेली दिसते. दुरुनच धावत येऊन बछड्याच्या मृतदेहाजवळ सिंहिण थांबते. बछड्याजवळ पोहोचताच ती आधी त्याचा वास घेते आणि तोंडाने बछड्याला हलवण्याचा प्रयत्न करते. त्याचा मृत्यू झाला नसेल म्हणून त्याला चाटायचा प्रयत्नही ती करते. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे समजू शकलं नाही.

सिंहिण हळूवार पावलं टाकत त्या मृतदेहाजवळ उभा राहते आणि त्यानंतर मोठा आक्रोश करते. इतरवेळी सिंह जशी डरकाळी फोडतो त्यापेक्षा आक्रोश करत असताना फोडलेली डरकाळी वेगळी ऐकू येते. व्हिडिओ पाहताच भावनिक होऊन डोळ्यातून पाणी येतं.

हे वाचा - एक फेब्रुवारीपासून पॅसेंजर, लोकलसह सर्व ट्रेन रुळावर? जाणून घ्या खरं काय

व्हिडिओमध्ये दिसतं की सिंहिण जेव्हा डरकाळी फोडते तेव्हा मागे जिराफ दिसतात. तेसुद्धा शांतपणे उभा राहिलेले दिसतात. इतरवेळी सिंहाची डरकाळी ऐकून जिराफ किंवा इतर प्राणी पळून जातात. पण आजची डरकाळी ही शिकारीसाठी नव्हती तर तो एका आईचा आक्रोश आहे हे त्यांना समजलं असावं. त्या आईच्या दु:खात ते सहभागी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral video lion roaring in grief emotional wild life