south korea:बेपत्ता महापौरांचा मृतदेह झाडीत सापडला; अध्यक्षपदाचे होते प्रबळ दावेदार

कार्तिक पुजारी
Friday, 10 July 2020

दक्षिण कोरीयाची राजधानी सोलचे महापौर पार्क वोन-सून (64) मेलेल्या अवस्थेत आढळले आहेत. ते गेल्या काही तासांपासून बेपत्ता होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. अखेर त्यांचा मृतदेह पोलिसांना झाडीत सापडला आहे.

सोल- दक्षिण कोरीयाची राजधानी सोलचे महापौर पार्क वोन-सून (64) मेलेल्या अवस्थेत आढळले आहेत. ते गेल्या काही तासांपासून बेपत्ता होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. अखेर त्यांचा मृतदेह पोलिसांना झाडीत सापडला आहे. या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. वोन-सून हे देशातील अध्यक्षानंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावी नेते होते. तसेच त्यांच्याकडे 2022 साली होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीचे प्रबळ उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं.

नेपाळची हिंमत वाढतेय; भारताविरोधात उचललं आणखी एक पाऊल
पार्क यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार ते गुरुवारपासून गायब झाले होते. त्यांचा फोनही बंद लागत होता. पोलिसांनी पार्क यांच्या शोधासाठी यंत्रणा सक्रिय केली होती. तब्बल 500 पोलिस ड्रोन आणि कुत्र्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात होता. साऊथ कोरीयाचे माजी अध्यक्ष रोह मू-ह्युन यांच्यानंतर हा सर्वात मोठ्या राजकीय नेत्याचा मृत्यू आहे. रोह यांनी 2009 मध्ये आत्महत्या केली होती.

पार्क यांचा मृतदेह एका टेकडीवरील झुडपात सापडला आहे. स्नुफर कुत्र्यांना ते झाडीत मेलेल्या अवस्थेत आढळले. पार्क यांच्या मृतदेहाजवळ त्यांचा मोबाईल आणि बॅग आढळली आहे. पोलिसांनी त्यांच्या मृत्यूवर कोणतही वक्तव्य करणं टाळलं आहे. शिवाय पोलिसांना कोणीही संशयीत आढळलेला नाही. त्यामुळे पार्क यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पार्क यांच्याविरोधात एका महिला सहकार्याने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. बुधवारी सोल मेट्रोपोलिटन पोलिस एजेंसीमध्ये ही तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी त्यांची चौकशी होणार होती.

स्फोटके शोधणे झाले सोपे !
पार्क यांच्याकडे भावी अध्यक्ष म्हणून पाहिलं जात होतं. सध्याचे अध्यक्ष मून जाई-इन आणि पार्क हे दोघे प्रोग्रेसीव डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत. मून यांच्यानंतर पार्क अध्यक्ष होतील असं मानलं जात होतं. पार्क यांचा सोलच्या महापौर म्हणून 2018 साली पुन्हा एकदा निवड झाली होती. राजकारणात येण्यापूर्वी ते मानवी हक्काचे काम करणारे वकील होते. ते लैगिंक अत्याचाराच्या खटल्यांवर काम करत होते. शिवाय जपानने 2010-15 साली कोरीयन भूमिवर केलेल्या अत्याचाराला बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते झगडत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: south koria Body of missing seoul mayor found in tree