
श्रीलंकेत निदर्शनादरम्यान सत्ताधारी खासदाराची हत्या; संचारबंदी लागू
कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे (Mahindra Rajpakshe) यांनी आज पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, गेल्या काही तासांपासून श्रीलंकेत सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकिर्ती अथुकोर्ला (Amarakeerthi Athukorala) यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे विविध ठिकाणी करण्यात येणाऱ्या निदर्शनादरम्यान राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेत दुसऱ्यांदा आणीबाणी लागू केल्यानंतर देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहेत. (Ruling Party MP Killed In Srilanka)
हेही वाचा: जनताच मतपेटीतून नशा उतरवते; चित्रा वाघांचा शिवसेनेवर हल्लाबोल
श्रीलंकेतील नितांबुवा येथे करण्यात येणाऱ्या निदर्शनावेळी खासदार अथुकोर्ला यांची कार थांबवण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी खासदार अमरकिर्ती यांच्यावर गोळीबार केला त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दिवसेंदिवस ढासळत चाललेली परिस्थिती आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर सरकारच्या समर्थक गटाने केलेल्या निदर्शकांनंतर राजधानी कोलंबोतमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर हिंसा रोखण्यासाठी पुढील सूचना मिळेपर्यंत संपूर्ण श्रीलंकेत तत्काळ प्रभावाने कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
हेही वाचा: श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा; स्थानिक मीडियाची माहिती
राष्ट्रपतींचे संयम बाळगण्याचे आवाहन
दरम्यान, श्रीलंकेतील एकूण परिस्थिती पाहता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी ट्वीट करत सर्वसामान्यांना संयम राकण्याचे आवाहन केले आहे. तसेच हिंसाचारामुळे हिंसाचार पसरेल. देशात उद्भवलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Web Title: Sri Lanka Ruling Party Mp Found Dead After Clashes Over Economic Crisis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..