जग संपण्याची वाट पाहात त्यांनी तळघरात काढली नऊ वर्षे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सातही जणांनी नऊ वर्षात कधीच केस देखील कापले नसल्याने त्यांची अवस्था अतिशय भयानक होती.

एसेन : नेदरलँडच्या एका गावात एका परिवाराने जग संपण्याची वाट पाहात तब्बल नऊ वर्षे केवळ तळघरात राहात काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कुटूंबातील एक व्यक्ती जवळच्याच गावात बीयर पिण्यासाठी गेला असताना त्याने ही धक्कादायक माहिती तेथील लोकांना देत त्यांची मदत मागीतली. 

नेदरलँडच्या ड्रेन्थ प्रांतातील एका फार्ममध्ये 58 वर्षीय इसम हा 18 ते 25 वर्षातील 6 बहिन-भावडांसह गेली 9 वर्षे तळघरात राहात होता. भावंडातील सर्वांत मोठा असणा-या मुलाने कसाबसा त्या घरातून पळ काढत जवळच्याच रुईनरवॉल्ड या गावात जात तेथील लोकांना हा प्रकार सांगितला. दरम्यान ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरीत तेथे जात 58 वर्षीय व्यक्तीला अटक करत सर्व मुलांची तेथून सुटका केली.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव जोसेफ असे असून तो मुळचा ऑस्ट्रियाचा असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच तेथील महापौर रॉजर डी ग्रूट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत सांगितले की, सुरुवातीला तो व्यक्ती आम्हाला सर्व मुलांचा वडील वाटला मात्र असे नव्हते. तसेच त्या सातही जणांनी नऊ वर्षात कधीच केस देखील कापले नसल्याने त्यांची अवस्था अतिशय भयानक होती असेही महापौरांनी सांगितले. 

दरम्यान संबधित प्रकाराबाबत तेथील शेजा-यांना विचारले असता, संबधित फार्म हाऊसवर जाण्यासाठी एका ब्रिजवरून जावे लागत असल्याने जास्त कोणी तेथे जात नव्हते तसेच आम्ही केवळ त्या 58 वर्षीय व्यक्तीलाच अनेकदा पाहिले होते असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They spent nine years in the basement waiting for the world to end

टॅग्स