तिसऱ्या टप्प्यातील कोरोना चाचणीला सुरुवात; 15 हजार जणांना लसही टोचली

कार्तिक पुजारी
Saturday, 18 July 2020

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली- जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात लस कधी तयारी होईल याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. अनेक देशांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. यात एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील वृत्त ग्लोबल टाईम्सने दिलं आहे.

भारतीय 'कोवॅक्सिन' लसीची मानवी चाचणी 375 स्वयंसेवकांवर; वाचा सविस्तर
सध्या जगभरात कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे. अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण करत दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. त्यातच यूएईमधून मोठी बातमी आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झालेली ही जगातील पहिलीच लस ठरली आहे. शिवाय कोरोनावरील या लसीचे चांगले परिणाम आल्याचं सांगितलं जात आहे. 

दुबईतील हेल्थकेअर कंपनी आणि चीनची सिनोफार्म कंपनी संयुक्तरित्या या लसीची निर्मिती करत आहे. या कंपन्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे परिक्षण पूर्ण करुन तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणाला सुरुवात केल्याचा दावा केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी 15 हजार स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली होती. त्यांना गुरुवारी लस देण्यात आली आहे. यात यूएईचे नागरिक आणि प्रवाशांचाही समावेश आहे. 

महाराष्ट्र पोलिसांनी केलं ट्विट अन् वेधले सगळ्यांचेच लक्ष! 
विशेष म्हणजे संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य विभागाचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन मोहम्मद अल हमीद हे लसीच्या चाचणीत भाग घेणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींपैकी
एक आहेत. कंपनीच्या अन्य एक हजार लोकांनाही ही लस देण्यात आल्याची माहिती आहे. या लसीने चाचणीचे दोन्ही टप्पे व्यवस्थितरित्या पार केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणही यशस्वी ठरल्यास ही मोठी गोष्ट ठरणार आहे. शिवाय ही लस तयार झाल्यास यूएईला पहिली कोरोनारील लस निर्माण केल्याचा मान मिळू शकणार आहे.

दरम्यान, जगभरात कोरोना लसीच्या निर्मितीसाठी वैज्ञानिक, डॉक्टर दिवसरात्र काम करत आहेत. माहितीनुसार, जगभरात 120 पेक्षा अधिक लसींवर सध्या परिक्षण सुरु आहे. यात अमेरिकेच्या मॉडर्ना आणि ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने पहिल्या टप्प्यातील परिक्षण पार केले आहे. शिवाय रशियानेही मानवी चाचणीचा पहिला टप्पा पार केल्याचा दावा केला. भारताची भारत बायोटेक कंपनी लसीवरील पहिल्या टप्प्यातील चाचणी घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The third phase of testing begins 15000 people were also vaccinated