तीन महिन्यांत 'इसिस'ला हद्दपार होईल : इराक 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

मोसूलमध्ये 'इसिस'ने नागरिकांची ढाल बनवित इराकी फौजांवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे मोसूल पूर्णपणे ताब्यात घेणे अद्याप इराकला शक्‍य झालेले नाही. अद्यापही अंदाजे दीड लाख नागरिक मोसूलमध्ये अडकून पडल्याची शक्‍यता आहे. शहराबाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास 'इसिस'कडून शिरकाण केले जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

बगदाद : 'इसिस' या कट्टर दहशतवादी संघटनेला देशातून पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी लष्कर आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी यांना आणखी तीन महिने लागतील, असे प्रतिपादन इराकचे पंतप्रधान हैदर अबादी यांनी केले. 'इसिस'चा बालेकिल्ला असलेल्या मोसूल शहरावर ताबा मिळविण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. 

लष्करी कारवाईसंदर्भात बगदादमध्ये काल (मंगळवार) बैठक झाली. त्यानंतर पंतप्रधान अबादी यांनी इराकमधील वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली. 'इसिस'च्या दहशतवाद्यांनी 2014 च्या जूनमध्ये मोसूलवर ताबा मिळविला होता. कडव्या संघर्षानंतर इराकच्या फौजा ऑक्‍टोबरमध्ये मोसूलच्या जवळपास पोहचू शकल्या होत्या. 'डिसेंबरअखेरीपर्यंत मोसूल पूर्णपणे मुक्त केले जाईल,' असा अंदाज अबादी यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. पण मोसूलमध्ये दाखल झाल्यानंतर इराकच्या फौजांची वाटचाल संथ झाली आहे. 

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीचे कमांडर लेफ्टनंट जनरल स्टीफन टाऊनसेंड यांनी मोसूलसंदर्भात गेल्या सोमवारी 'डेली बिस्ट'ला मुलाखत दिली होती. 'इराकमधील मोसूल आणि सीरियामधील रक्का या बालेकिल्ल्यांतून 'इसिस'ला हद्दपार करण्यासाठी दोन वर्षे लागतील,' असे वक्तव्य त्यांनी केले होते. 'संघर्षानंतर दमलेल्या फौजेला विश्रांती देण्यासाठी इराकी सैन्याची मोसूलमधील आगेकूच थंडावली आहे,' असेही टाऊनसेंड म्हणाले. 

मोसूलमध्ये दाखल होण्यासाठीच्या लढाईत इराकी फौजांचाच समावेश होता. आता अमेरिकी सैनिकही मोसूलमध्ये दाखल होतील, अशी शक्‍यता 'रॉयटर्स'ने वर्तविली होती. मात्र, 'इराकी फौजांना प्रशिक्षण देणे, सल्ला देणे आणि साह्य करणे एवढीच आमची भूमिका आहे,' असे सांगत अमेरिकेने सातत्याने लष्करी कारवाईतील सहभाग नाकारला आहे. 

Web Title: Three months needed to eliminate ISIS from Mosul